लहान भाऊ दारूसाठी पैसे मागतो, त्रास देतो म्हणून मोठ्या भावाने लहान भावाला पंख्याच्या पात्याने गळा कापून संपविल्याची घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडली.
बाबू उर्फ प्रदीप शिवाजी गवळी असे खून झालेल्या २३ वर्षीय तरूणाचे नाव असून मनोज शिवाजी गवळी वय २८ असे अटक करण्यात आलेल्या मोठ्या भावाचे नाव आहे.
नितीन श्रीरंग बनसोडे वय ३२ यांनी याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
प्रदीप व मनोज हे दोघेही हडपसरमधील १५ नंबर परिसरात खोली भाड्याने घेवून राहात होते. प्रदीप हा रिक्षा चालविण्याचे काम करीत होता. मनोज हा खाजगी ट्रॅव्हल्स बससाठी प्रवासी शोधण्याचे काम करीत होता.
मनोजच्या पत्नीला प्रदीपचे घरी राहाणे आवडत नव्हते त्यावरून मनोज आणि त्याच्या पत्नीमध्ये सातत्याने वाद सुरू होते. सातत्याने होणा-या वादाला कंटाळून मनोजची पत्नी गावाला निघून गेली होती. प्रदीपला दारूचे व्यसन होते. तो दारू पिण्यासाठी मनोजकडे सतत पैशांची मागणी करीत होता. प्रदीपचे दारूचे व्यसन बाहेरख्याली वर्तनामुळे मनोज कंटाळला होता.
प्रदीप रात्री खोलीमध्ये झोपला होता. त्यावेळी मनोजने मध्यरात्रीच्या सुमारास घरातील पंख्याच्या पात्याने प्रदीपचा गळा कापून खून केला. हडपसर पोलीसांनी घटनास्थळी जावून मृतदेह ताब्यात घेतला.
प्रदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आला असून पोलीसांनी मनोजला अटक केली.