शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांचे निधन;शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा
कोल्हापूर:- डी.वाय.पाटील शैक्षणिक समूहाचे संस्थापक, त्रिपुरा आणि बिहारचे माजी राज्यपाल तसेच शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ.डी.वाय पाटील यांचे मंगळवारी वयाच्या ९० व्या वर्षी कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. डॉ.डी.वाय.पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देत देशभरात अनेक शैक्षणिक संस्था,अभियांत्रिकी,वैद्यकीय,कृषी,व्यवस्थापन आणि इतर उच्च शिक्षण संस्था उभारल्या. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
याशिवाय त्यांनी बिहार आणि त्रिपुरा राज्यांचे राज्यपाल म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य आणि दूरदृष्टी यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडले. त्यांच्या निधनाने देशाने एक दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ,समाजसेवक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.