पाथर्डी शहर हद्दीतील चितळे वस्तीवर दरोडा ; सोन्याच्या दागिन्यांसह २० हजारांची रोख रक्कम लंपास
पाथर्डी शहर हद्दीतील चितळे वस्तीवर अज्ञात सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकून तीन वयोवृद्धांना जबर मारहाण केली.
लिंबाजी नाथ चितळे वय - ६५, बाबुराव गुणाजी उळगे वय - ६५, कमलाबाई लिंबाजी चितळे वय - ५८, सर्वजण रा.शेवगाव रोड चितळेवस्ती, पाथर्डी यांना कु-हाडीच्या.दांड्याने मारहाण करण्यात आली.
जखमींच्या डोक्याला गंभीर मार लागला असून हातही फ्रॅक्चर झाला आहे.
यावेळी करण्यात आलेल्या जबर मारहाणीमुळे लिंबाजी नाथ चितळे अत्यवस्थ आहेत.
शुक्रवारी मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास शेवगाव रोडवरील प्रेमश्री पेट्रोलपंपासमोर राहाणा-या लिंबाजी चितळे यांच्या घरावर सहा अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी प्रथम बाहेर झोपलेल्या कमलाबाई चितळे यांना जबर मारहाण केली.
त्यानंतर घराचा दरवाजा तोडून घरात झोपलेल्या लिंबाजी चितळे, बाबुराव गुणाजी उळगे, लक्ष्मीबाई उळगे यांच्यापैकी लिंबाजी व बाबुराव यांना जबर मारहाण करण्यात आली.
लक्ष्मीबाई उळगे यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र, कानातील स़ोन्याचे दागिने दरोडेखोरांना काढून दिले. त्यांना दरोडेखोरांनी मारहाण केली नाही. या घटनेत सोन्याच्या दागिन्यांसह २० हजारांची रोख रक्कम आरोपींनी लांबविली.