पती-सासूचे बारीक तुकडे करुन मेघालयात फेकले;
सात महिन्यांचा धक्कादायक घटनाक्रम*
गुवाहाटी:-महारष्ट्राला गुवाहाटी हे नाव चांगलंच परिचित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिथून बंड यशस्वी केलं त्या गुवाहाटीमध्ये एक हादरवून सोडणारं हत्याकांड घडलं आहे.एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पती आणि सासूची हत्या केली. त्यानंतर त्यांच्या शरीराचे बारीक तुकडे करुन ते मेघालय राज्यात फेकून दिलं. या प्रकाराने आसाम राज्य हादरवून गेलं आहे.
मागील काही दिवसांपासून खून करुन मृतदेहाचे तुकडे करण्याचे प्रकार वाढलेले आहेत. दिल्लीतल्या श्रद्धा वालकर खून प्रकरणाने देशात अनेक प्रश्न उपस्थित झाले. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या श्रद्धा आणि आफताब यांच्यात वाद झाला आणि आफताबने श्रद्धाचा खून करुन मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे साठवण्यासाठी त्याने एक फ्रिज खरेदी केला होता. यथावकाश आफताब श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकून द्यायचा. सहा महिन्यानंतर या घटनेचा छडा लागला.
अशीच एक घटना आसाममधील गुवाहाटीमध्ये घडली आहे. वंदना कलिता या महिलेने ऑगस्ट २०२२ मध्ये पती अमरज्योती डे आणि सासू शंकरी डे गायब झाल्याची तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांच्या हाती कुठलीच माहिती लागली नव्हती.नोव्हेंबर २०२२ मध्ये अमरज्योती यांच्या चुलतभावाने पोलिस ठाण्यात नवीन तक्रार दिली. त्यामध्ये अमरज्योती यांची पत्नी वंदना हिच्यावर संशय घेण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. पोलिसांना एकेक पुरावा मिळत गेला. वंदनाने सासू शंकी डे यांच्या बँक खात्यातून पैसे काढले होते. याच माहितीवरुन पोलिसांनी पुढील तपास केला.
पोलिसांनी अमरज्योती डे आणि वंदना कलिता यांचे कॉल, एसएमएस याचा तपास केला, सीडीआर मिळवले, मोबाईल लोकेशन्स तपासले; यानंतर महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले.घटनेच्या सात महिन्यांनंतर पोलिसांना खूनाचा छडा लागला. सासू आणि पतीचा खून वंदना कलिता हिनेच केल्याचं स्पष्ट झालं. वंदनाने प्रियकर आणि मित्रासोबत मिळून हे कांड केलं होतं. पोलिस उपायुक्त दिगंत चौधरी यांनी याबाबत माहिती दिली.
वंदनाने सासू आणि पतीचा खून केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे छोटे-छोटे तुकडे करुन ते फ्रिजमध्ये ठेवले होते. शेजारच्या मेघालय राज्यामध्ये त्या तुकड्यांची तिने विल्हेवाट लावली होती. पोलिसांना रविवारी चेरापुंजीजवळ शंकरी डे यांच्या मृतदेहाचे तुकडे सापडले आहेत.