शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील पाझर तलावातील पाणीसाठ्यात प्रचंड घट झाली आहे.
कोंढापुरी येथील पाझर तलाव ३.७५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठवण क्षमतेचा असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत शिक्रापूर व रांजणगाव गणपती या गावांतील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना राबविलेली आहे.
कोंढापुरी,खंडाळे ,गणेगाव खालसा,निमगाव म्हाळूंगी, कासारी ,कवठीमळा शिवारातील शेतक-यांच्या शेतीला या तलावातील पाण्याचा फायदा होत आहे.
परिसरातील शेतक-यांची खरीप हंगामाची तयारी चालू आहे. नवीन ऊस लागवडीच्याही तयारीत शेतकरी आहेत. शेतक-यांनी शेतात खोडवा ऊस राखलेला आहे.
या परिसरात काकरणी एक हजार दोनशे रूपये एकर, ऊस बांधणी अठराशे ते दोन हजार रूपये एकर ट्रॅक्टरचालकांकडून आकारले जात आहे. डिझेल दरवाढीचे कारण सांगितले जात आहे. रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.
पाझर तलावाच्या भराव रस्त्याच्या कडेला वाढलेली काटेरी झुडपे काढून टाकण्यात आलेली आहेत.
तलावातील पाणी जसजसे कमी होत आहे तसतश्या शेतक-यांना जलवाहिन्या, पाईप टाकावे लागत आहे. शेतक-यांचे लक्ष पावसाकडे लागले आहे.
पाझर तलावात चास कमान धरणाचे पाणी कधी येईल या प्रतिक्षेत तलावावर अवलंबून असलेले शेतकरी आहेत.