• Total Visitor ( 666240 )
News photo

मुरबाडमध्ये पोलिसांसाठी फिजिओथेरपी कॅम्पचे आयोजन

Raju Tapal publisher August 15, 2026 64

मुरबाडमध्ये पोलिसांसाठी फिजिओथेरपी कॅम्पचे आयोजन



राजू टपाल.



मुरबाड :- स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने मुरबाड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच मुरबाड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी,अंमलदार व होमगार्ड्स यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने फिजिओथेरपी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना सततची ड्युटी,दीर्घकाळ उभे राहणे,वाहन चालविणे,बैठ्या स्वरूपाचे काम आणि अनियमित दिनचर्येमुळे कंबरदुखी, पाठदुखी,मानदुखी,गुडघेदुखी,खांदेदुखी तसेच स्नायूंवरील ताण अशा विविध शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर या आरोग्यविषयक कॅम्पचे आयोजन करण्यात आले. कॅम्पमध्ये डॉ.मयुरी हरड यांनी उपस्थित पोलीस अधिकारी,अंमलदार व होमगार्ड्स यांना विविध शारीरिक समस्यांवर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. कंबर,पाठ,मान,गुडघे व शरीराच्या इतर भागांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आवश्यक व्यायाम व स्ट्रेचिंग तसेच दैनंदिन कामकाजात शरीराची योग्य ठेवण कशी ठेवावी,याबाबत त्यांनी माहिती दिली. डॉ.हरड यांनी घरच्या घरी सहज करता येणारे विविध सोपे व्यायाम व स्ट्रेचिंगचे प्रकार प्रत्यक्ष करून दाखविले. योग्य पद्धतीने व्यायाम केल्याने शरीराची लवचिकता वाढण्यास,स्नायूंवरील ताण कमी करण्यास तसेच दैनंदिन कामामुळे होणारा शारीरिक त्रास कमी करण्यास मदत होऊ शकते,असे त्यांनी सांगितले. कॅम्पदरम्यान पोलीस अधिकारी,अंमलदार व होमगार्ड्स यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध व्यायाम व स्ट्रेचिंगचे प्रात्यक्षिक केले. पोलीस दलाचे शारीरिक आरोग्य उत्तम राहून अधिकारी व अंमलदार अधिक सक्षमपणे कर्तव्य बजावू शकतील,या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरला. या आरोग्यविषयक उपक्रमाबद्दल मुरबाड पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने डॉ. मयुरी हरड यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

“निरोगी पोलीस दल – सक्षम पोलीस दल” या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम उपस्थितांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरला. 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement