राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्रियदर्शनी झोड प्रथम
दुसऱ्यांदा राज्यस्तरीय प्रथमचा बहुमान : टाकावू पदार्थातून नकाशा वाचन
अमरावती दि.८ :- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे द्वारा आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2024-25 मध्ये विषय सहायक व विषय साधनव्यक्ती गटातून प्रियदर्शनी नामदेवराव झोड ह्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. 'स्पर्शाने बनवूया उठावदार नकाशा' हा त्यांच्या नवोपक्रमाचा विषय होता. विशेष म्हणजे यापूर्वीही त्यांनी सन 2022-23 मध्ये राज्यस्तरावर प्रियदर्शिनी झोड यांनी प्रथम क्रमांक पटकाविला होता.
प्रियदर्शनी नामदेवराव झोड ह्या गटसाधन केंद्र पंचायत समिती चांदूर बाजार येथे समावेशित विषय साधनव्यक्ती ह्या पदावर कार्यरत आहे. समाजातील अल्पदृष्टी व अंध प्रवर्गातील विद्यार्थ्याना परिसर अभ्यास हा विषय अध्ययन अध्यापन करताना अनंत अडचणी येतात. या अडचणीवर मात करण्यासाठी प्रियदर्शनी झोड यांनी परिसरातील गहू, तांदूळ, तुर व विविध डाळ, कडधान्य सोबत रांगोळी, प्लास्टर ऑफ पॅरिस, मनी, दगड, जाड धागे आदी घरातील विविध वस्तूंचा वापर करून महाराष्ट्र व विविध उठावदार नकाशांची निर्मिती केली. यामुळे विद्यार्थ्याना कोणते पीक कोणत्या जिल्ह्यात पिकते हे स्पर्शाने ओळखता येते. नकाशे उठावदार असल्याने विद्यार्थ्यांना ब्रेल लिपी प्रमाणे स्पर्शाचा अनुभव मिळून विषय समजायला सोपा जातो.
यापूर्वी सन 2022-23 मध्ये 'साहित्य बनवूनी घरी,थेरेपी होईल आनंददायी' ह्या विषयावर नवोपक्रम सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकाविला होता. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत राज्यातील 1104 स्पर्धकांनी नोंदणी करून स्पर्धेत सहभाग नोंदविला. यापैकी काहींनी जिल्हास्तर व विभागस्तरिय स्तरावर सादरीकरण करून 50 स्पर्धकांची निवड राज्यस्तरीय फेरीसाठी करण्यात आली. राज्यस्तरीय फेरी 6 फेब्रुवारी 2025 रोजी विद्या परिषद पुणे येथे घेण्यात आली. यामध्ये 50 स्पर्धकांनी पाच गटात सादरीकरण केले. दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी विद्या परिषद पुणे येथे बक्षीस वितरण सोहळा घेण्यात आला.
प्रियदर्शिनी झोड यांच्या या नवोपक्रमाचे कौतुक परीक्षकांनी करत समाजातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग निश्चितच प्रेरणादायी असल्याचे म्हटले. त्यांच्या या यशाबाबत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य मिलिंद कुबडे, ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रेमला खरटमोल, विजय शिंदे, संपर्क अधिकारी पवन मानकर, डॉ. राम सोनारे, डॉ. दीपक चांदूरे, डॉ.विकास गावंडे गटशिक्षणाधिकारी वकार खान, दीपक चांदुरे आदींनी अभिनंदन केले आहे.