पुण्यातील जादूटोण्याच्या घटनेची महिला आयोगाकडून दखल;
Raju Tapal
January 21, 2023
34
पुण्यातील जादूटोण्याच्या घटनेची महिला आयोगाकडून दखल;
तातडीने कारवाई करण्याचे आदेश
पुण्यातील धायरी परिसरातील जादूटोण्याच्या अघोरी पुजेच्या घटनेची महिला आयोगाने दखल घेतली आहे.त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
"पुण्यात मूल होत नसल्याने महिलेला मानवी हाडांची राख खाऊ घातल्याचा अघोरी प्रकार उघडकीस आला होता. विद्येचे माहेरघर, जागतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यातील हा प्रकार निंदनीय, अमानवी आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची स्वाधिकारे दखल घेतली असून सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना तातडीने कार्यवाही करत आयोगास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत," असं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.
विद्येच्या माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात जादूटोणा करुन अघोरी पूजा केल्याचा प्रकार समोर आला होता. घरामध्ये सुख शांती नांदावी भरभराट व्हावी आणि मूल बाळ व्हावं यासाठी पतीसह सासू सासऱ्यांनी महिलेची अघोरी पूजा केली होती. पुण्यातील सिंहगड रोजवरील धायरी परिसरात हा प्रकार घडला होता. पत्नीला आरोपी पती तसेच घरातील इतर जण संगनमत करुन शारीरिक आणि मानसिक छळ करुन वारंवार मारहाण करुन शिवीगाळ करायचे. पुणे शहरातील धायरी भागात हा प्रकार 2019 पासून सुरु होता. पीडित महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सासरच्या कुटुंबातील सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती जयेश पोकळे, दीर श्रेयस पोकळे, जाऊ ईशा पोकळे, सासरे कृष्णा पोकळे, सासू प्रभावती पोकळे, दीपक जाधव आणि बबिता जाधव अशी आरोपींची नावे आहेत.
मागील काही दिवसांपासून पुण्यात जादूटोण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांना रोखण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत. त्यासंदर्भात काही आढळलं तर तक्रार करण्याचं आवाहनदेखील करण्यात आलं आहे. मात्र तरीही हे प्रकार सातत्याने सुरु असल्याचं समोर येत आहे. या घटनांमुळे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या घटनेची महिला आयोगाने दखल घेतली आहे आणि तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी अशी घटना वैकुंठ स्मशानभूमीत समोर आली होती. त्यावेळी पोलीसांनी अघोरी प्रकार करणाऱ्या दोघांना अटक केली होती.
Share This