रांजणगाव हत्याकांडातील आरोपीस अहिल्यानगर मधून अटक
शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- शिरूर तालुक्यातील श्री.क्षेत्र रांजणगाव गणपती हद्दीतील खंडाळे माथा येथे रविवार दि.२५ मे २०२५ रोजी दुपारच्या सुमारास तरूण महिलेसह दोन लहान मुलांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आले होते. रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी गुन्हा रजिस्टर्ड नं.१६४ /२०२५ भान्यास १०३ (१) ,२३८ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
या हत्याकांडाचा तपास करण्यात जिल्हा ग्रामीण पोलीसांना यश आले असून या हत्याकांडातील आरोपीला अहिल्यानगरमधून अटक केली आहे.
अनैतिक संबंधातून विवाह करण्याचा तगादा लावल्याने दिरानेच भावजय व तिच्या मुलांचा खून केल्याचा प्रकार पोलीसांच्या तपासात उघडकीस आला आहे.
या घटनेबाबत समजलेल्या माहितीनूसार,
गोरख पोपट बोखारे वय -३६ वर्षे सध्या रा.सरदवाडी ता.शिरूर जि.पुणे मूळ रा.चिखली ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून स्वाती केशव सोनवणे रा.वाघोरा ता.माजलगाव जि.बीड ,तिची मुले स्वराज वय -२ व विराज वय -१ अशी खून झालेल्या तिघांची नावे आहेत.
आरोपी हा मृत महिलेच्या बहिणीचा दीर असल्याचं उघड झालं असून मृत महिला व तिच्या नव-यामध्ये नेहमी भांडण होत असत.आरोपी गोरख बोखारे हा त्यांच्या मधील वाद मिटवत असायचा. याचदरम्यान आरोपी गोरख बोखारे व मृत महिला यांच्यामध्ये प्रेमसंबंध तयार झाले.त्यामुळे ही महिला गोरख बोखारे यांच्याकडे सातत्याने लग्न करण्याची मागणी करत होती.पण बोखारे याला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं याच वादातून त्यानं या महिलेला कायमचं संपविण्याचा कट रचला.
आरोपी गोरख बोखारे याने मोटरसायकलवरून संबंधित महिला व तिच्या दोन्ही लहान मुलांना आळंदीतून घेवून शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे नेताना रात्रीच्या वेळेस रांजणगाव गणपती गावाजवळ बंद असलेल्या कंपनीच्या रस्त्यालगत थांबवलं. यावेळी त्यानं संबंधित महिला व तिच्या दोन्ही लहान मुलांचा डोक्यात दगड घालून खून केला .त्यानंतर तिघांच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून पेटवून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलीसांनी १२ दिवसांत गुन्हा उघड केला.
या हत्याकांडाच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलीसांच्या २७ टीम तयार केल्या होत्या.या टीमनं २५० सीसीटीव्ही तपासून १६ हजार ५०० भाडेकरूंकडून माहिती गोळा केली.ज्या ठिकाणी मृतदेह सापडले त्या रस्त्याने जाणा-या लोकांकडे तपास केला. सहा पथक तयार करून त्यांंना तपासाला पाठवलं. कोल्हापूर, संभाजीनगर,नाशिक आणि कोकण परिक्षेत्रात तपास केला.पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनमधील ३३ पोलीस स्टेशनचे तपास पथक या कामात तैनात होते असे समजते.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे