"अरे तिच्या बापाला काय वाटलं असेल",
रत्नागिरीत कंडक्टरने विद्यार्थीनीची काढली छेड;
मुलींनी दाखवला दुर्गावतार
रत्नागिरी:-सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय. त्यात काही व्हिडीओ असे असतात की, जे पाहून काळजात धडकी भरते; तर काही व्हिडीओ पाहून 'हे असंच व्हायला हवं', असे शब्द तोंडातून आपसूकच निघतात.देशात बऱ्याच ठिकाणी मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न अजूनही तसाच आहे. जिकडे तिकडे मुलींवर होणाऱ्या अत्याचारांविषयी आपण ऐकत असतो. पण, त्याच वेळी अत्याचाराविरुद्ध आवाज उठवून जिथल्या तिथल्या धडा शिकविणाऱ्या मुली फार कमी असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात बस कंडक्टरने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढली म्हणून तिच्यासह दोन विद्यार्थिनींनी त्या कंडक्टरला चांगलाच चोप दिलाय.
महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये दोन विद्यार्थिनी बस कंडक्टरला मारहाण करीत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रस्त्याच्या मधोमध या दोन्ही मुली बस कंडक्टरला चप्पलने मारहाण करताना दिसतायत. सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, बस कंडक्टरने चालत्या बसमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढली म्हणून तिच्यासह असलेल्या दुसऱ्या विद्यार्थिनीने बस थांबवली आणि जमावासमोर त्या दोघींनी त्याला मारहाण केली.
'तुझ्या पोरीची छेड काढायला पाठवू का? बघायचंय का कसं वाटतं ते तुला? ज्या मुलीची छेड काढलीस, तिच्या बापाला कसं वाटलं असेल?', असे व्हायरल झालेल्या व्हिडीओत ती विद्यार्थिनी बस कंडक्टरला म्हणताना दिसतेय. तसेच दोन्ही विद्यार्थिनी संताप व्यक्त करीत कंडक्टरला चांगलाच धडा शिकवताना दिसतायत.
कोलाथुरे-दापोली-रत्नागिरी एसटी बसमध्ये पंचनदी येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी बसमधूून प्रवास करत असताना ही घटना घडल्याचा दावा केला जात आहे. तसेच हा व्हिडीओ @ajaychauhan41 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. घटनेची नेमकी वेळ व तारीख अद्याप माहीत नाही आणि या प्रकरणाच्या संबंधात पोलिसांनी कोणतीही कारवाई केल्याचे वृत्त नाही. मुलींनी बस कंडक्टरला चप्पलने मारहाण केल्याचा व्हिडीओ बसमध्ये उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांनी रेकॉर्ड केला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत एका युजरने लिहिले, 'या हरामखोरांचे हात-पाय तोडून टाका.' दुसऱ्याने 'जोपर्यंत समाजात अशी गिधाडे आहेत, तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही,' असे लिहिले. 'त्याला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे', असेही एक जण म्हणाला.