ठाणे येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाणे दौरा
महाराजस्व अभियाना’च्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर,ठाणे महसूल प्रशासनाची जय्यत तयारी
ठाणे :- महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवार,३० जुलै २०२६ रोजी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ हा मुख्य केंद्रबिंदू असणार आहे. महसूल विभागाच्या योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत जलद आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचवणे, प्रलंबित महसूल प्रकरणांचा निपटारा करणे आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणी तातडीने सोडवणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या अभियानामुळे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतीमान होण्यास मोठी मदत होणार आहे. महसूल मंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महसूल प्रशासनाने जय्यत तयारी केली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. दौऱ्याची सुरुवात गुरुवारी सकाळी ९:३० वाजता देवश्री गार्डन,ऋतू पार्क जवळील आ.श्रीमती माधवी नाईक यांच्या कार्यालयास भेट दिल्यानंतर सकाळी १०:३० वाजता गडकरी रंगायतन समोरील श्री शिवसमर्थ विद्यालय येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ कार्यक्रमास मंत्री महोदय उपस्थित राहतील. हे अभियान केवळ प्रशासकीय कामकाज नसून सामान्य नागरिकांसाठी शासकीय दाखले,जमिनीच्या नोंदी,फेरफार आणि इतर महसुली सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. अभियानाच्या कार्यक्रमानंतर दुपारी १२:०० वाजता शिवसमर्थ विद्यालय येथेच महसूल मंत्री नागरिकांची निवेदने स्विकारून त्यांच्या समस्या थेट जाणून घेणार आहेत. यानंतर गडकरी रंगायतन येथे दि. ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन व सोसायटी मंच ठाणे यांच्या सत्कार समारंभास ते उपस्थित राहतील. दुपारी ३:१५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,ठाणे येथे महसूल,मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग तसेच भूमी अभिलेख विभागाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभराच्या विविध उपक्रमांनंतर सायंकाळी ५:१५ वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री महोदय प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील आणि सायंकाळी ५:४५ वाजता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सशी संवाद साधणार आहेत. प्रशासकीय आढावा,थेट लोकसंपर्क आणि महाराजस्व अभियानाचा प्रभावी अंमलबजावणी संदेश देणारा हा संपूर्ण दौरा असेल,यात शंकाच नाही. जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने,ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील,इतर सर्व उपजिल्हाधिकारी-प्रांताधिकारी,तहसिलदार रेवण लेंभे,सचिन चौधर,इतर सर्व तहसिलदार-नायब तहसिलदार,महसूल विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी तसेच भूमी अभिलेख,कृषी,सामाजिक न्याय,आरोग्य यांच्यासह विविध शासकीय विभागांच्या सहभागाने ठाणे महसूल प्रशासनाकडून या संपूर्ण दौऱ्याचे व अभियानाचे नियोजन अत्यंत सुटसुटीत आणि नागरिकांच्या सोयीचे होईल अशा रीतीने करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ अवश्य घ्यावा,असे आवाहन ठाणे महसूल प्रशासनाने केले आहे.