६ कोटींना ग़डा घालून फरार झालेल्या शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथील सरपंचाला शिरूर पोलीसांनी गजाआड करण्याची कारवाई केली.
अप्पा सिताराम बेनके असे अटक करण्यात आलेल्या आरोपी सरपंचाचे नाव आहे.
शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथील सरपंच आप्पा बेनके याच्या विरोधात २०१८ ते २०२१ या दरम्यान फसवणूक केल्याबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाल्यापासून आप्पा बेनके फरार होता.
रामचंद्र बेनके, सिताराम बेनके, बापूसाहेब बेनके यांच्या शेतजमिनीवर ६ कोटी रूपये कर्ज काढले. त्या कर्जासाठी दिलेल्या जमिनीचे ७/१२ उता-यावर गावात नेमणूक असलेल्या तलाठी गोरक्षनाथ इंगळे यांच्या नावाचे शिक्के तयार केले. खोट्या सह्या करून ७/१२ उतारा , अधिक कर्ज बोजा नोंद त्याची खोट नोट तयार करून स्वत:च सादर करून फसवणूक केली होती. रितसर फिर्याद दाखल झाल्यानंतर तो गायब झाला होता.
फरार असलेला सरपंच आप्पा बेनके हा त्याच्या गावी येणार असल्याची माहिती शिरूर पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित पवार, अंमलदार राजेंद्र गोपाळे, शंकर चव्हाण यांनी शिताफीने पाठलाग करून त्याला पकडले.
पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत पुढील तपास करत आहेत.