संजय ऐलवाड यांची शुभ्राची परसबाग तिसरीच्या पाठ्यपुस्तकात
शिरूर:- बाल साहित्यकार संजय ऐलवाड यांची ‘शुभ्राची परसबाग’ ही बाल कथा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ,पुणे (बालभारती) यांच्या इयत्ता तिसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. या कथेत मुलांना पालेभाज्या व फळभाज्यांची ओळख,त्याचे महत्त्व,उपयुक्तता आणि भाज्यांची निर्मिती प्रक्रिया याविषयी सहज व सोप्या पद्धतीने माहिती देण्यात आली आहे. तसेच या कथेत विविध प्रकारच्या भाज्या ही मानवी गरज असून त्यातून मिळणारी जीवनसत्वे शरीरासाठी कसे आवश्यक आहेत. त्यामुळे भाज्या खाताना मुलांनी नाक न मुरडता त्या खाल्या पाहिजेत असा संदेशही देण्यात आला आहे. इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात कवी कुसुमाग्रज,वसंत बापट,य. दि. फडके,ना. धो. महानोर,ग. ह. पाटील,भारत सासणे,दासू वैद्य,डॉ. सुरेश सावंत,आंबा महाजन,उत्तम सदाकाळ,डॉ. निलीमा गुंडी,वंदना विटणकर आदी साहित्यिकांच्या साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. ऐलवाड यांचे दोन बाल कवितासंग्रह,तीन बाल कथासंग्रह,तीन बाल कादंबर्या अशी आठ पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच प्रांढासाठी दोन कथासंग्रह,एक कवितासंग्रह,एक आरटीओच्या कामकाजाच्या माहितीचे पुस्तक आणि दोन संपादित पुस्तके अशी 14 पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषद,मराठवाडा साहित्य परिषदेच्या पुरस्कारासह अन्य पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. सध्या ते दै. ‘केसरी’त बातमीदार म्हणून कार्यरत आहेत.