• Total Visitor ( 435835 )
News photo

संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख बारावी परीक्षा उत्तीर्ण

Raju tapal May 05, 2025 77

संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख बारावी परीक्षा उत्तीर्ण;

मिळाले ८५.३३ टक्के गुण 



निकाल लागला पण कौतुकाची थाप द्यायला वडील नाहीत 



वैभवी जिद्दीने म्हणाली, वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार 



बीड :- बीडच्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख बारावी पास झाली आहे. तिला बारावीला ८५.३३ टक्के गुण मिळाले आहेत. वडिलांच्या हत्येनंतरच्या कठीण काळात वैभवीने चिकाटीने बारावीची परीक्षा दिली आणि तिला चांगले यश मिळाले. बारावीचा निकाल लागल्यानंतर संतोष देशमुखांची मुलगी खूपच भावुक झाली. निकालानंतर कौतुकाची थाप द्यायला आज माझे वडील नाहीत अशी खंत व्यक्त करताना वैभवी देशमुखच्या डोळ्यात अश्रू तरळले. माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना फाशीच शिक्षा द्या अशी मागणी तिने यावेळी केली.



आज बारावीचा निकाल लागला मला 85.33% गुण मिळाले आहेत. परंतु, माझ्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला माझे वडील नाहीत, अशा शब्दात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने आपल्या वडिलांची आठवण जागवली.12 वीच्या निकालानंतर वैभवीचे महाराष्ट्र भरातून कौतुक होत आहे. मात्र, आज तिचं कौतुक करायला तिचे वडील तिच्यासोबत नाहीत याचं मोठं दुःख वैभवीला आहे. वैभवीच्या डोळ्यातील अश्रू तिच्या आनंदी क्षणात अनेकांचे डोळे पाणावणारे ठरत आहेत. माझी NEET परीक्षेची देखील तयारी सुरू आहे. परंतु, काल झालेला नीटचा पेपर मला अवघड गेलेला आहे, त्याच्यात स्कोरिंग कमी येत आहे. पण, मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे, अशी जिद्द देखील तिने बोलून दाखवली.



दरम्यान, वडिलांच्या निधनाने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर असताना वैभवीने 12 वीची परीक्षा दिली होती. आज सकाळी वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या पश्चात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचे तिने म्हटले. त्यांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगलाच येईल असा मला विश्वास आहे. तर आज माझे वडील माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी नाहीत याचं मला दुःख आहे, अशी खंत तिने व्यक्त केली होती. तो काळ खूपच कठीण होता. आज आम्ही विचार देखील करू शकत नाही. ते दु:खाचे डोंगर याआधी आम्ही कधीच अनुभवले नाही आणि आम्ही स्वप्नात देखील विचार केला नव्हता. पण कुणाचीही मानसिकता नव्हती तरी देखील सर्वांना वाटते की मी माझ्या करिअरमुळे परीक्षा द्यावी. म्हणू मी परीक्षा दिली. सर्वांच्या साथीने आणि वडिलांच्या आशीर्वादाने निकाल चांगला लागला.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement