• Total Visitor ( 666244 )
News photo

प्रतिकूल परिस्थितीतही सामान्य रुग्णालयाची सेवा अखंडित...

Raju Tapal publisher August 15, 2026 20

इमारत बदलली,पण रुग्णसेवेचा ध्यास कायम!” : डॉ. कैलास पवार



प्रतिकूल परिस्थितीतही सामान्य रुग्णालयाची सेवा अखंडित; स्वातंत्र्य दिनी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम



ठाणे :- रुग्णालयाची इमारत तात्पुरती असू शकते; मात्र रुग्णसेवेची बांधिलकी आणि सेवाभाव कायमस्वरूपी आहे. प्रत्येक रुग्णाला सन्मानाने,संवेदनशीलतेने आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे,” असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले. मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानाची परिस्थिती असतानाही सामान्य रुग्णालय,ठाणे येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. कैलास पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रुग्णालयातील अधिकारी,कर्मचारी,परिचारिका,आरोग्यसेवक आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या सामान्य रुग्णालयाचा कारभार तात्पुरत्या सेटअपमधून सुरू आहे. मात्र मर्यादित आणि आव्हानात्मक परिस्थितीतही रुग्णसेवा अखंडित ठेवण्यासाठी अधिकारी-कर्मचारी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे आणि सेवाभावाचे डॉ. पवार यांनी कौतुक केले. परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी सेवाभावाची ज्योत मंद होता कामा नये. रुग्णांची सेवा ही केवळ जबाबदारी नसून समाजाप्रती आपले कर्तव्य आहे,”असेही त्यांनी सांगितले. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातून रुग्णालयातील आरोग्यसेवकांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कर्तव्याला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. पावसाच्या सरींमध्येही राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी एकत्र आलेला रुग्णालयीन परिवार हा त्यांच्या राष्ट्रप्रेमासोबतच सेवाभावाचा संदेश देणारा ठरला.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement