शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवर दरोडा प्रकरणी आरोपींना अटक
पिस्तुलाचा धाक दाखवून शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवर भरदिवसा दरोडा टाकून पावणे तीन कोटी रूपयांची लूट केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण पोलीसांनी पाच आरोपींना अटक केली.
डॉलर उर्फ प्रविण सिताराम ओव्हाळ रा.वाळद ,खेड, अंकुश महादेव पावळे रा.कावळ पिंपरी जुन्नर, धोंडीबा महादेव जाधव निघोज,कुंड,पारनेर जि.नगर, आदिनाथ मच्छिंद्र पठारे रा.पठारवाडी पारनेर जि.नगर, विकास सुरेश गुंजाळ रा.टाकळीहाजी ता.शिरूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून २ कोटी १९ लाखांचे सोने व १८ लाख रूपयांची रोकड पोलीसांनी जप्त केली.
२१ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी सव्वा एक वाजता शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवर सशस्त्र दरोडा पडला होता.
५ आरोपींनी बँकेचे कॅशियर, कर्मचारी व ग्राहकांना हातातील पिस्तुलाचा धाक दाखवून कॅशियरला हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्यांनी बँकेतील ३२ लाख ५२ हजार ५६० रूपयांची रोख रक्कम, २ कोटी ४७ लाख २० हजार ३९० रूपये किंमतीचे ८२४ तोळे १३० मिलीग्रँम वजनाचे सोने असे एकूण २ कोटी ७९ लाख ७२ हजार ९५० रूपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम दरोडा टाकून चोरून नेले होते.
याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना सदरचा गुन्हा डॉलर उर्फ प्रवीण सिताराम ओव्हाळ याने त्याच्या साथीदारासह केल्याची माहिती खब-यामार्फत मिळाली. आरोपींचा शोध घेत येत असताना आरोपी मध्यप्रदेशात गेल्याची माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी ओव्हाळच्या शोधासाठी पोलीसांचे एक पथक मध्यप्रदेश येथे रवाना झाले. त्यानंतर आरोपी हा अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने आरोपीस निघोज येथून ताब्यात घेवून त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने इतर चार आरोपींच्या मदतीने दरोडा टाकल्याची कबुली दिली.