जिल्ह्यात सिकलसेल नियंत्रण सप्ताह
ठाणे- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम आरोग्य संस्थास्तरावर राबविण्यात येत असून जिल्हयामध्ये आरोग्य विभागामार्फत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुक्यांमध्ये सर्व शासकीय आरोग्य संस्था, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे दि. ११ डिसेंबर, २०२४ पासून ते १७ डिसेंबर, २०२४ हा कालावधी “सिकलसेल नियंत्रण सप्ताह’’ म्हणून साजरा करण्यात येत आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या सूचनेनुसार प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांची तपासणी करून लोकांमध्ये या आजार विषयक जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यावेळी तपासणी सोबत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून समुपदेशन व जनजागृती केली जात आहे. तसेच शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना (वय १२ ते १७) सिकलसेल आजार त्याचे संक्रमण, संभाव्य धोके इत्यादीबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्यामध्ये सिकलसेल आजार आढळून येतो, हा आजार अनुवंशिक असून या आजारावर अद्याप कोणताही कायमस्वरूपी उपचार उपलब्ध नाही. या आजाराने ग्रस्त असलेल्या रोगी व वाहक व्यक्तीवर औषधोपचार करण्यात येत असले तरी या रोगाचा प्रादुर्भाव पुढच्या पिढीमध्ये टाळता यावा यासाठी लोकांमध्ये या विषयी जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे, म्हणून दिनांक ११ ते १७ डिसेंबर हा कालावधी ‘’सिकलसेल नियंत्रण सप्ताह’’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
सिकलसेल हा आजार आनुवंशिक आजार आहे. सिकलसेल ग्रस्त व्यक्तीला नियमित औषधोपचारांची गरज असते. सिकलसेल वाहक व्यक्ती बाह्यता निरोगी दिसते परंतु असे रुग्ण समाजात रुग्णांनाची संख्या वाढविण्यास कारणीभूत ठरू शकतात, म्हणून सर्वांनी जागरूक राहून सिकलसेल आजार संदर्भांत काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
या आजाराची लक्षणे ही अशक्तपणा, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, सांधे दुखी, सांधे सुजणे, शरीर पिवळसर होणे, असह्य वेदना होणे, लहान बालकांना वारंवार जंतु संसर्ग होणे, चेहरा निस्तेज दिसणे ही आहेत. या आजाराचे निदान शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत केले जाते. सर्व शासकीय आरोग्य संस्थेत सिकलसेलची तपासणी मोफत केली जाते. सिकलसेल वाहक व ग्रस्त रुग्णास मोफत समुपदेशन, औषधोपचार व संदर्भ सेवा उपलब्ध आहेत.
सिकलसेल हा आजार रक्तदोष आजार असून सिकल पेशी रक्तक्षय या नावाने ओळखला जातो. या आजारात लाल रक्त पेशींचा आकार विळ्यांसारखा होत असल्याने पेशींची लवचिकता कमी होते. यामुळे गुंतागुंत निर्माण होते. सिकलसेल पेशी आजारामुळे नेहमीची होणारी गुंतागुंत म्हणजे रक्तक्षय (अनिमिया) या आजारावर वेळीच लग्नापूर्वी तपासणी केली तर पुढच्या पिढीला अनुवंशीकतेने होणाऱ्या या आजारापासून आपण वाचवू शकतो, म्हणून लग्न करण्यापूर्वी मुलगा-मुलगी दोघांनीही रक्ताची तपासणी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.