अशीही बालाजी भक्ती!
तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं;
किंमत ऐकून थक्क व्हाल....
आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यापैकी अनेकजण त्यांच्या श्रद्धेनुसार मंदिरात दान देतात. यामध्ये उद्योगपतींपासून ते सामान्य भक्तांपर्यंत सर्वांचा समावेश असतो. अशातच एका भाविकाने मंगळावारी तिरुपती बालाजीच्या चरणी तब्बल १२१ किलो सोनं दान केलं आहे. या सोन्याची किंमत जवळपास १४० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी याबाबत माहिती दिली.
ते म्हणाले, “एका भक्ताने व्यवसाय सुरु करण्यापूर्वी तिरुपती बालाजी मंदिरात प्रार्थना केली होती. श्री वेंकटेश्वर स्वामीच्या कृपेने त्याला व्यवसायात यश मिळाले आणि त्याने कंपनीचे ६० टक्के शेअर्स विकून ६,००० ते ७,००० कोटी रुपये नफा मिळवला. त्यानंतर त्याने १२१ किलो सोने दान करण्याचा निर्णय घेतला.”
पुढे बोलताना नायडू यांनी सांगितले की, ''मंदिरातील मूर्तीला दररोज १२० किलो सोन्याच्या दागिन्यांनी सजवले जाते. ही बाब त्याला समजल्यानंतर त्याने १२१ किलो सोने दान करण्याचा निर्णय घेतला. महत्त्वाचे म्हणजे त्याने हे गुप्त दान असल्याचं सांगत स्वत:ची ओळख उघड न करण्याची विनंती केली आहे''
तिरुपती बालाजी मंदिरात अशाप्रकारे दान देण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा या मंदिराला मोठं दान मिळालं आहे. मे २०२५ मध्ये उद्योगपती संजीव गोयंका यांनी ३.६३ कोटी रुपये किंमतीचा हिरे जडवलेला सोन्याचा हार बालाजी चरणी दान केला होता. तसेच जुलै २०२५ मध्ये चेन्नईतील सुदर्शन एंटरप्रायझेसने २.४ कोटी रुपये किंमतीचे २.५ किलो सोने दान मंदिरात दान केले होते.
तिरुमाला तिरुपती देवस्थान हे जगातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक मानले जाते. दररोज हजारो भक्त दर्शनासाठी या मंदिरात येतात आणि आपल्या श्रद्धेनुसार सोने, चांदी, दान देतात. या पैशातून तिरुमाला तिरुपति देवस्थान भक्तांना परिवहन, निवास आणि इतर मूलभूत सुविधा पुरवत असते.