स्वारगेट बलात्कार प्रकरण :-
सरपंचांसह ग्रामस्थानी नाकारलं १ लाखाचं बक्षिस
पुणे:-शहरातील स्वारगेट बस स्थानकात एक 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या दत्ता गाडेचे गाव गुणाट येथुन अटक करण्यात आली होती. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी जाहीर केलेली १ लाख रुपयांची बक्षीसाची रक्कम गावात वादाचं कारण ठरली आहे. त्यामुळे सरपंचांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
शिरूरपासून सुमारे २० किमी अंतरावर गुणाट हे गाव आहे. हे गाव पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचे मूळ गाव आहे. हा गुन्हा घडल्यानंतर जवळपास तीन दिवस आरोपी गाडे फरार होता. गुन्हा करून आरोपी दत्तात्रय गाडे आपल्या गावी जाऊन ऊसाच्या शेतात लपला होता. त्याचा लवकर शोध लागावा म्हणून पोलिसांनी टीप देणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं. मात्र याच बक्षीसासाठी गावात वाद सुरू झाला होता.
गुणाटचे सरपंच रामदास काकडे म्हणाले..
या प्रकरणी गावातील आरोपीला पकडून देण्याच्या श्रेयवादाने गोंधळ व वाद निर्माण झाल्यामुळे गुणाटचे सरपंच रामदास काकडे यांनी मोठी भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, आरोपी गाडेला आम्ही पकडून दिलं असं अनेक ग्रामस्थ म्हणत आहेत. त्यामुळे बक्षिसाच्या १ लाख रुपयांवर अनेकजण दावा करत होते. त्यामुळे ही बक्षिसाची रक्कम नक्की कुणाला द्यायची यासंबंधी गावात वाद सुरू झाला होता. हा वाद टाळण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीची एक सभा घेऊन हे जाहीर करणार आहोत की, या बक्षीसच्या रकमेतला एकही रुपयाही आम्हाला नको. यामध्ये ज्या ज्या ग्रामस्थांनी पोलिसांना आरोपी पकडण्यास मदत केली आहे त्या सर्वांशी आम्ही बोललो असता, त्यांनीही या निर्णयाला होकार दिला आहे, असं सरपंच रामदास काकडे यांनी म्हटलं आहे.