एक हजार कोटींच्या निविदा रद्द.नक्की धक्का कोणाला?
मुंबई :- मुंबई महानगरपालिकेत प्रशासकीय राजवटीच्या काळात काढण्यात आलेल्या एक हजार कोटींच्या कामांच्या निविदा रद्द करण्यावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. चार निविदा रद्द करणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे) पक्षाने केला असून हा आरोप शिवसेना (शिंदे) पक्षाला चांगलाच झोंबला आहे. या निविदांसाठी प्रशासनावर कोणाचा दबाव होता असा सूचक सवाल शिवसेना (शिंदे) पक्षाने केला असून नक्की कोणाला धक्का बसला आहे त्याचे आत्मचिंतन करावे असा पलटवार शिंदे यांच्या शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर केला आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने गेल्या काही काळामध्ये एक हजार कोटींच्या चार निविदा रद्द केल्या आहेत. त्यात रस्त्यांवर रंगांचे पट्टे मारण्याच्या कामाची दिडशे कोटींची निविदा, पदपथावर रेलिंग लावण्याची ३४५ कोटींची निविदा,प्राणी संग्रहालयाचा विस्तार करण्याची ४९० कोटींची निविदा आणि शालेय वस्तू खरेदीची १५० कोटींची निविदा या चार निविदांचा समावेश आहे. या निविदा रद्द करण्यावरून महापालिकेत सध्या राजकारण तापले आहे. मुंबईकरांचा पैसा वाचवला म्हणून सत्ताधारी पक्षाने स्वत:ची पाठ थोपटून घेतलेली असली तरी या विषयावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षावरच टीका केली आहे. प्रशासकीय काळातील निविदा रद्द केल्यामुळे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे) पक्षाने केला आहे. हा आरोप शिवसेना (शिंदे) पक्षाचे गटनेते अमेय घोले यांनी फेटाळून लावला आहे. मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना (शिंदे) महायुतीची सत्ता असून निविदा रद्द करण्याचा निर्णय एकत्रित घेण्यात आल्याचे घोले यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. यावेळी भाजपचे गटनेते गणेश खणकर उपस्थित होते. शैक्षणिक साहित्याची खरेदी केंद्र सरकारच्या पोर्टलवरून करायची म्हणून त्याची निविदा रद्द केली. तर अन्य कामांच्या निविदा अंदाजित खर्चापेक्षा जास्त दराने आल्या होत्या म्हणून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का असा आरोप करून महायुतीत फूट पाडल्याचे दाखवण्याचा शिवसेना (ठाकरे) पक्षाचा प्रयत्न असून तो खोटा आहे असा आरोप घोले यांनी केला. पदपथावर रेलिंग लावण्याच्या कामाच्या निविदेसाठी २०२१ मध्ये प्रशासनावर कोणाचा दबाव होता असा सूचक सवाल घोले यांनी केला आहे. नक्की धक्का कोणाला असाही टोला घोले यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षाला लगावला आहे.