ठाणे क्राईम ब्रँचकडून ₹५.६७ कोटींचे MD ड्रग्ज जप्त
नार्कोटिक्स सेलची मोठी कारवाई;१८० चोरीचे व हरवलेले मोबाईलही हस्तगत करून मूळ मालकांना परत
राजू टपाल.
ठाणे :-ठाणे क्राईम ब्रँचच्या नार्कोटिक्स सेलने अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ₹५ कोटी ६७ लाख रुपये किमतीचे MD (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त केले आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला आहे.
ठाणे क्राईम ब्रँचकडून अमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाई केली जात असून, त्याचाच एक भाग म्हणून नार्कोटिक्स सेलने ही धडक कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या MD ड्रग्जची किंमत अंदाजे ₹५.६७ कोटी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान,ठाणे क्राईम ब्रँचने आणखी एका महत्त्वपूर्ण कारवाईत चोरीला गेलेले तसेच हरवलेले तब्बल १८० मोबाईल फोन शोधून काढले. तांत्रिक तपासाच्या आधारे हे मोबाईल हस्तगत करण्यात आले असून,तपासानंतर ते त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. क्राईम ब्रँचच्या या दोन्ही कारवायांमुळे अमली पदार्थ तस्कर तसेच मोबाईल चोरी करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक निर्माण झाला असून,नागरिकांकडून पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.