• Total Visitor ( 514564 )
News photo

धर्मवीरांच्या जयंतीलाच ठाणे महापालिकेचा विसर!

Raju Tapal publisher May 15, 2026 44

धर्मवीरांच्या जयंतीलाच ठाणे महापालिकेचा विसर!



कोपरीत स्मारक उभारून श्रेय घेतलं;पण संभाजी महाराजांना अभिवादनालाही प्रशासन गैरहजर



ठाणे :- थोर महापुरुषांचे स्मारक उभारून श्रेय घेण्यात आघाडीवर असलेल्या ठाणे महानगरपालिकेचा आणखी एक बेफिकीर कारभार समोर आला आहे. ठाणे पूर्व,कोपरी येथील रचनाधीरज सोसायटीजवळ उभारण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शौर्य स्मारकाकडे जयंतीदिनीच (गुरुवार, १४ मे) पालिकेने पाठ फिरवल्याचे दिसून आले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्मारक परिसरात कोणतेही सुशोभीकरण करण्यात आले नाही. एवढेच नव्हे तर साधा पुष्पहार अर्पण करण्याची तसदीही पालिका प्रशासनाने घेतली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “महापुरुषांचे स्मारक उभारायचे,उद्घाटनाचे फोटो काढायचे आणि नंतर पूर्ण विसर पडायचा…हीच का महापालिकेची संस्कृती?” असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. विशेष म्हणजे,शहरभर विविध कार्यक्रमांवर लाखो रुपयांची उधळण करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी काही फुले अर्पण करण्याचाही वेळ मिळाला नाही का,अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे. स्मारक हे केवळ दगड-मातीचे बांधकाम नसते,तर ते इतिहास,स्वाभिमान आणि प्रेरणेचे प्रतीक असते. मात्र जयंतीदिनीच स्मारक ओस पडल्याने पालिकेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात ठाणे महापालिका नौपाडा-कोपरी प्रभाग समितीशी संपर्क साधला असता,तेथील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की,जयंती साजरी करण्याचे काम महापालिका जनसंपर्क विभागाचे असून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शौर्य स्मारकावरील जयंती कार्यक्रमाबाबत आम्हाला कोणतेही निर्देश देण्यात आले नव्हते. दरम्यान,गुरुवारी रात्री काही शिवप्रेमींनी स्वतः पुढाकार घेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शौर्य स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. “पालिका विसरली,पण आम्ही नाही,” अशी भावना यावेळी शिवप्रेमींनी व्यक्त केली.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement