देश जळतोय,नीरो चॉकलेट वाटतोय
भारत इंधनटंचाईच्या आगीत जळत आहे. जनता रांगेत उभी आहे. चुली विझल्या आहेत. पेट्रोल पंपांवर ‘दंगली’ होतील अशी भीती आहे. परदेशी चलनावर प्रचंड ताण पडला आहे. सोने खरेदीवर अघोषित बंदी असताना हे महाशय आर्थिक संकट असल्याचे जाहीर करून स्वतः इटलीत जाऊन ‘चॉकलेट’ वाटतात हे देशाची प्रतिष्ठा वाढवणारे कृत्य नाही,तर एका बेजबाबदार,ढोंगी नेत्याची नौटंकी आहे. लोकांनी त्यांची तुलना ‘नीरो’शी केली. देश जळतोय आणि येथील ‘नीरो’ चॉकलेट वाटतोय,अशी टीका केली तर भक्तांना चिडायचे कारण नाही! ते खरेच आहे. 'मेलोडी' चॉकलेटवरून भारतात खूप धमाल माजली आहे. भारतात आर्थिक संकटाचे वादळ घोंघावत आहे. लोक पेट्रोल-डिझेलच्या,एलपीजी गॅसच्या रांगेत आहेत. अशा संकटात कोणत्याही नेतृत्वाने स्वदेशात राहून लोकांना आधार दिला पाहिजे,पण आपले पंतप्रधान इटलीत गेले. तेथील पंतप्रधान मेलोनी यांना भारतातून मेलोडी चॉकलेट्सची भेट घेऊन गेले. यावर देशात टीका सुरू आहे. आर्थिक संकट धडक मारत आहे. शेतकरी,युवक,महिला… सगळे अश्रू ढाळत आहेत. व्यापारी,छोटे दुकानदार घायकुतीला आले आहेत. 'नीट'चे पेपर फुटले आहेत. मणिपूर जळत आहे. अशा संकटकाळी मोदी हे इटलीत जाऊन 'चॉकलेट' वाटत आहेत. जगात भारताची प्रतिष्ठा वाढवण्याचे काम श्रीमान मोदी करत आहेत असे यावर शरद पवार यांचे म्हणणे आहे. इटलीच्या महिला पंतप्रधानांना चॉकलेट देणे, सेल्फी काढणे,संकटग्रस्त देश वाऱ्यावर सोडून परदेशवाऱ्या करणे यातून देशाची प्रतिष्ठा कशी काय वाढली,ते एकदा पवार साहेबांनी लोकांना समजून सांगायला हवे. मोदी हे मेलोनीबाईंना चॉकलेट घेऊन गेले हा टीकेचा विषय नाही. देशाला काटकसरीचा,सबुरीचा उपदेश देऊन हे महाशय स्वतः मेलोनींबरोबर 'रील'मध्ये मशगूल आहेत,हा टीकेचा विषय आहे. पंतप्रधान परदेश दौऱ्यावर असताना त्यांच्यावर टीका करू नये,पण पंतप्रधान परदेशात जाऊन नेमके काय करीत आहेत, कसे वर्तन करीत आहेत हा जेव्हा चर्चेचा विषय ठरतो तेव्हा त्यावर बोलावेच लागेल. पंतप्रधान इटली वगैरे देशांत गेल्याने काही रणनीतिक समझोते झाले. (काय खरे ते त्यांनाच माहीत!) त्यामुळे पुढील 10-20 वर्षे भारताचे भविष्य सुरक्षित झाले असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात. भारताचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पंतप्रधानांना इटलीच्या मेमसाबना 'चॉकलेट' द्यावे लागते, सेल्फी काढाव्या लागतात. या नव्या वैश्विक परराष्ट्र धोरणाचा शोध यानिमित्ताने लागला. आमचे पंतप्रधान मेलोनी मेमसाबना चॉकलेट घेऊन गेले. त्यांनी फाफडा,ढोकळा,खांडवी,अळुवडी,बाकरवडी (चितळ्यांची) नेली असती तरी चालले असते. रबडी,जिलेबीचा स्वादही मेमसाबना चाखवला असता तरी देशाने त्यांचे स्वागत केले असते,पण देश जळत असताना पंतप्रधान युरोपात मौज करीत आहेत ही चिंतेची गोष्ट आहे. मोदी अशा संकटसमयी भारत सोडून नॉर्वे,इटली,नेदरलॅण्ड वगैरे देशांत गेले नसते तर काय मोठा भारतीय प्रतिष्ठेचा डोंगर खचला असता? इटलीची लोकसंख्या 58 दशलक्ष इतकी आहे. दिल्ली-मुंबईतील रेल्वे व मेट्रोत यापेक्षा जास्त लोक रोज प्रवास करतात. इटली हा युरोपातील सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या असलेला देश आहे. मोदी तर फक्त 75 वर्षांचे आहेत. इटलीची सैन्य शक्ती 1.65 लाख इतकी आहे. त्यांचे सैन्य फार मोठे नाही. तरीही सैन्याची गुणवत्ता,आधुनिकता,नौदल शक्ती चांगली आहे. इटलीचे 'चलन' मजबूत आहे व स्वतः पंतप्रधान मेलोनी या खंबीर नेत्या आहेत. इराण-इस्रायल-अमेरिका युद्धात मेलोनी यांनी एक मजबूत भूमिका घेतली व युद्धखोरांना खडे बोल सुनावण्याची हिंमत दाखवली. ट्रम्प यांच्या धमक्यांची,दबावाची पर्वा मेलोनी यांनी केली नाही. पोप साहेबांवर प्रे. ट्रम्प यांनी वायफळ टीका केली तेव्हा मेलोनी या पोप साहेबांच्या मागे ठामपणे उभ्या राहिल्या. इस्रायलची दहशतवादी भूमिका जगाने मान्य करू नये असे त्यांनी सांगितले. त्यावेळी श्रीमान मोदी या गंभीर जागतिक प्रश्नावर मूग गिळून गप्पगार बसले व आता चॉकलेट घेऊन मेलोनी यांना भेटीला गेले. हे त्यांचे परराष्ट्र धोरण. मोदी समर्थक सांगत आहेत की, इटलीबरोबर भारताची स्पेशल स्ट्रटेजिक पार्टनरशिप आणि वीस अब्ज डॉलर्सचे व्यापारी करार झाले,पण या करारांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील काय?,महिलांना स्वयंपाकाचा गॅस, तरुणांना रोजगार, इंधन मिळणार आहे काय? भारत संकटात असताना इटलीचे नेते भारताच्या बाजूने ठामपणे उभे राहिल्याचे कधी दिसलेले नाही व मोदींनी मेलोनींना चॉकलेटचा डबा दिला म्हणून संपूर्ण कश्मीर हा भारताचाच भाग असल्याचे विधान त्या करणार नाहीत,हे लक्षात घेतले पाहिजे. इटलीबरोबर संरक्षणविषयक करार झाले याचाच अर्थ संरक्षण क्षेत्रातील आपली आत्मनिर्भरता इटलीसारख्या देशावर अवलंबून आहे. त्यामुळे नव्या स्वरूपात 'वंदे-माता-रोम'चा उदय झाला,असे उद्या कोणी म्हटले तर त्याचे काय उत्तर मोदी भक्तांकडे आहे? रोम ही इटलीची राजधानी आहे. 'रोम जळत असताना नीरो फिडल वाजवत होता' अशी एक ऐतिहासिक दंतकथा आहे. 'पाव मिळत नसेल तर केक खा,' असेही फ्रेंच राज्यक्रांतीच्या इतिहासातील फ्रान्सची तत्कालीन राणी मारी आंत्वानेत हिचे तेथील गरीबांना उद्देशून केलेले एक वक्तव्य नेहमीच सांगितले जाते. आज तेच दृश्य भारतात उभे राहिले आहे असे दिसते. फक्त पात्रे बदलली आहेत. इथे भारत इंधनटंचाईच्या आगीत जळत आहे. जनता रांगेत उभी आहे. चुली विझल्या आहेत. पेट्रोल पंपांवर 'दंगली' होतील अशी भीती आहे. परदेशी चलनावर प्रचंड ताण पडला आहे. सोने खरेदीवर अघोषित बंदी असताना हे महाशय आर्थिक संकट असल्याचे जाहीर करून स्वतः इटलीत जाऊन 'चॉकलेट' वाटतात हे देशाची प्रतिष्ठा वाढवणारे कृत्य नाही,तर एका बेजबाबदार,ढोंगी नेत्याची नौटंकी आहे. लोकांनी त्यांची तुलना 'नीरो'शी केली. देश जळतोय आणि येथील 'नीरो' चॉकलेट वाटतोय,अशी टीका केली तर भक्तांना चिडायचे कारण नाही! ते खरेच आहे.