• Total Visitor ( 133106 )

२०२५ पर्यंत टीबीमुक्त भारताचे लक्ष्य !

Raju tapal January 24, 2025 17

२०२५ पर्यंत टीबीमुक्त भारताचे लक्ष्य !

वेंगुर्ले :- भारत सरकारने २०२५ पर्यंत टीबीमुक्त भारतचे लक्ष्य ठेवले असून त्या दिशेने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने क्षयरोग निर्मूलनासाठी राष्ट्रीय धोरणात्मक योजना सुरू केली आहे. क्षयरोगाला कारणीभूत ठरणाऱ्या मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्यूलोसिस जीवाणूमध्ये काही वेळा उत्परिवर्तन होऊन औषधांना दाद न देणारे प्रकार तयार होतात. अशा प्रकाराला औषधरोधक क्षयरोग म्हणतात.

औषधप्रतिकारक्षमतेनुसार, या जीवाणूंचे वर्गीकरण CBNAAT मशिनद्वारे तपासणी करून औषधसंवेदनशील, मोनो-रेझिस्टंट, मल्टीड्रग रेझिस्टंट (एमडीआर) आणि एक्स्टेन्सिव्ह ड्रग रेझिस्टंट (एक्सडीआर) सारख्या प्रकारांमध्ये केले जाते. औषधरोधक क्षयरोग झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी अधिक वेळ लागतो आणि औषधांचे दुष्परिणाम तपासण्यासाठी दर महिन्याला डॉक्टरांकडे तपासणी आवश्यक असते. औषधसंवेदनशील क्षयरोगाच्या रुग्णांना सहा महिने उपचार घ्यावे लागतात, तर औषधरोधक क्षयरोगासाठी दोन वर्षांपर्यंत उपचार घ्यावा लागू शकतो.

भारत सरकार आणि केंद्रीय क्षयरोग विभाग क्षयरोग निर्मूलनासाठी विविध धोरणात्मक उपक्रम राबवत आहेत. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा क्षयरोग विभाग, वेंगुर्ले तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आणि वेंगुर्ले तालुका मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साई डिलक्स हॉल वेंगुर्ले येथे आयोजित "क्षयरोग निदान व उपचार”, “१०० दिवस राष्ट्रीय क्षयरोग जनजागृती अभियान" आणि "कुष्ठरोग निवारण पंधरवडा कार्यक्रम" या विषयावर  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र लिलके यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी क्षयरोगावरील शासकीय धोरणे आणि योजनांविषयी विवेचन केले.

यावेळी त्वचारोग तज्ज्ञ डॉ. किरण नाबर यांनी कुष्ठरोगाची लक्षणे, उपचार व रुग्णांनी घ्यायची काळजी यावर मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ले मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश्वर उबाळे, सचिव डॉ. संजीव लिंगवत, डॉ. प्रल्हाद मणचेकर, जिल्हा क्षयरोग पर्यवेक्षक रमेश परब उपस्थित होते. या कार्यक्रमाने क्षयरोग व कुष्ठरोग जनजागृतीसाठी महत्वाचा टप्पा गाठला असून यावेळी उपस्थित डॉक्टर यांच्यासाठी आयोजित प्रश्नमंजुषा कार्यक्रमास आयोजिक यांनी समाधानकारक उत्तरे दिली.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य सहाय्यक विजय आंबेरकर, वरीष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक एस्. टि. वराडकर, निम कुष्ठरोग वैद्यकीय कर्मचारी नम्रता धुरी, समन्वयक सुरेश मोरजकर, प्रकल्प अधिकारी प्रथमेश ओटवणेकर, कर्मचारी नितीन जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.  यावेळी डॉ. डि.टि. शिवचरण, डॉ. प्रसाद साळगांवकर, डॉ. नयनेश गावडे, डॉ. के. जी. केळकर, डॉ. सतिश पाटील, डॉ. अश्विनी सामंत, डॉ. सई लिंगवत, डॉ. नेहा नवार, डॉ. सुदीश सावंत, डॉ. सोनाली सावंत, डॉ. अमरेश होडावडेकर, डॉ. अमेय खानोलकर, डॉ. सतिश पाटील, वंदन वेंगुर्लेकर, डॉ. परेश बोवलेकर, डॉ. आदेश आडेपवार, डॉ. गणेश गुट्टे, डॉ. धनश्री हिरेमठ , श्याम आगलावे, शुभम बुधेवार, डॉ. दत्तप्रसाद पवार, स्वप्नाली पवार, डॉ. नामदेव मोरे, डॉ. श्रिया सावंत आदी डॉक्टर्स उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत एस्. टी. वराडकर यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. संजीव लिंगवत यांनी केले.
 

Share This

titwala-news

Advertisement