स्थानिक नेते मंडळींच्या नाकर्तेपणाचे हे फलित; प्रारुप आराखड्यानूसार तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गट विसर्जित करण्यात आल्याबाबत शेतकरी संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष राजेंद्र ढमढेरे यांची प्रतिक्रिया
विजय ढमढेरे
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- स्थानिक नेते मंडळींच्या नाकर्तेपणाचे हे फलित आहे अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष राजेंद्र गोविंदराव ढमढेरे यांनी प्रारूप आराखड्यानुसार तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गट विसर्जित करण्यात आल्याबाबत व्यक्त केली आहे.
पुणे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप आराखड्यानूसार शिरूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण ७ गट , पंचायत समितीचे १४ गण सन २०११ च्या जनगणनेनुसार तयार केले आहेत.
शिरूर तालुक्यात कवठे येमाई, न्हावरे, रांजणगाव गणपती,पाबळ, सणसवाडी, शिक्रापूर तसेच मांडवगण फराटा असे ७ जिल्हा परिषदेचे गट तयार करण्यात आले आहेत.
नवीन आराखड्यानूसार तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गट विसर्जित करण्यात आला आहे.तळेगाव ढमढेरे गावाचे दोन गटात विभाजन करण्यात आले आहे.गट तर विसर्जित केलाच परंतु गावातील एक प्रभाग सणसवाडी गटाला जोडला असून उर्वरित दोन ते सहा प्रभाग शिक्रापूर गटाला जोडले आहेत.
शिक्रापूर गटामध्ये शिक्रापूर, कासारी, निमगाव म्हाळुंगी, तळेगाव ढमढेरे,पारोडी,दहिवडी,करंजावणे ,
भांबर्डे, उरळगाव,टाकळीभीमा ही गावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
सणसवाडी गटात कोरेगाव भीमा,वाडा पुनर्वसन,आपटी,वढू बुद्रुक,डिंग्रजवाडी,वाजेवाडी,सणसवाडी,धानोरे,दरेकरवाडी,विठ्ठलवाडी, तळेगाव ढमढेरे या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.
तळेगाव ढमढेरे गावात एकूण ६ प्रभाग आहेत. त्यापैकी प्रभाग क्रमांक १ सणसवाडी जिल्हा परिषद गटाला जोडला आहे तर प्रभाग क्रमांक २ ते ६ शिक्रापूर गटाला जोडले आहेत.
प्रारूप आराखड्याबाबत टिटवाळा न्यूज ला प्रतिक्रिया देताना शेतकरी संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष, तळेगाव ढमढेरे येथील राजेंद्र गोविंदराव ढमढेरे यांनी म्हटले आहे,
जिल्हा परिषद पुणे निवडणुकीसाठी गटांची पूर्वीची रचना होती. तिच्यामध्ये काही बदल झाले आहेत.तळेगाव ढमढेरे हा गट दोन प्रभागात विभागला आहे. हे स्थानिक नेते मंडळींच्या नाकर्तेपणाचे फलित आहे. या बदलाविषयी सामान्य नागरिकांच्या मनात तीव्र नाराजी असून याविषयी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची मागणी केली आहे. ग्रामसभेत या बदलाचा जाहीर निषेध करून सक्षम प्राधिकरणाकडे दाद मागणे, न्यायालयात जाणे अशा पर्यायांचा विचार केला जाणार आहे.तरीही न्याय मिळाला नाही तर समस्त गावकरी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहोत असे शेतकरी संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष, तळेगाव ढमढेरे येथील राजेंद्र गोविंदराव ढमढेरे यांनी प्रारूप आराखड्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे.