टिटवाळ्यातील महावितरणचा भोंगळ कारभार
Raju Tapal
October 27, 2021
72
वीज मीटर नाही दारात भरमसाठ बिल आले घरात
टिटवाळ्यातील महावितरणचा भोंगळ कारभार
अशिक्षित,विधवा,ज्येष्ठ नागरिक महिला मारतेय महावितरण कार्यालयाला चकरा
एकीकडे महावितरण कंपनीकडून वीजबिले थकीत असणाऱ्यांची विद्युत सेवा खंडित करण्याचा सपाटा लावलेला आहे. मात्र ज्यांची विद्युत सेवा तीन तीन महिन्यांपासून खंडित करून मीटर काढून नेलेला असतानाही आजही कित्येकांना हजारोंच्या घरात बिले येत आहे. त्यामुळे मीटर काढल्यानंतर त्याची नोंदच केली जात नसल्याचे या निमित्ताने स्पष्ट होत आहे.
टिटवाळ्यातील नांदप रोड वरील तिवारी चाळ येथील ९ नंबर खोलीत गेल्या आठ वर्षांपासून राहणाऱ्या शोभा सोपं भिलारे या ७० वर्षीय अशिक्षित,विधवा महिला एकटीच राहते. ती महावितरणच्या ०२०१११११२१४३ या नंबर वरून विद्युत सेवा घेत होती. ती धुणे भांडे वगैरे कामे करून आपला उदरनिर्वाह करीत होती. लॉक डाऊन आधी ती दिवसभर घराबाहेर राहून कामे करायची रात्री फक्त दोन तासांसाठी ती दोन ब्लब व एक फॅन लावीत असल्याने तिला अत्यन्त कमी बिल येत होते. मात्र तिचा मीटर फॉल्टी असल्याचे कारण सांगून विद्युत वितरणाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन महिन्यांपासून मीटर काढून नेलेला आहे. त्याबाबतची नोंदही फक्त दरवाजावर केलेली दिसून येतेय. तेव्हा पासून तिने आपल्या शेजाऱ्यांकडून विकतची लाईट घेतलेली आहे. मात्र आजही तिला नेहमी प्रमाणेच ११ ते १५ हजार रुपयांपर्यंतचे विद्युत बिल येत असल्याने तिच्यावर मोठे संकट ओढवलेले आहे. एकत्र घरी विद्युत वितरणाचा मीटरच नसतानाही १५ हजारांच्या आसपास बिल येते कसे असा प्रश्न तिच्या समोर उभा ठाकला असून तिने वारंवार महावितरण कार्यालयाला खेटे मारल्यानंतरही तिचे कुणीच म्हणणे ऐकले नसल्याने अखेर तिने मला मीटर नसताना हि एवढे बिल येतेच कसे याचा लेखी जाब नकार्यकारी अभियंता यांना विचारला असून यात दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तिने कारवाईची मागणी केलेली आहे.
एकंदरीत पाहता महावितरणच्या विद्युत सेवेचा एकीकडे बोजवारा उडत असल्याने विद्युत ग्राहक नाराज असताना हि अश्या प्रकारच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
Share This