शिरूर बायपासजवळील अपघातात दोघांचा मृत्यू
शिरूर (प्रतिनिधी):- शिरूर बायपास पाषाणमळ्याजवळ झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि.११ आॅगस्टला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. उद्योजक किशोर नामदेव यादव वय -३८ रा.वाडेगव्हाण ता.पारनेर जि. अहिल्यानगर,प्रथमेश प्रकाश लाड वय -३० रा.सुंदरसृष्टी शिरूर मूळ रा.कुंडल ता.पलूस जि.सांगली अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. वाडेगव्हाण येथील उद्योजक किशोर यादव हे त्यांच्या एन्डेवर क्रमांक एम एच १२ एस यू ५५८९ मोटारीतून शिरूरला कामानिमित्त आले होते. काम आटोपल्यानंतर बायपासवरील मित्रांना भेटून वाडेगव्हाणला जाण्यासाठी गावाबाहेरून जाणा-या पुणे नगर रस्त्यावरून हाॅटेल संग्राम समोरून यु टर्न घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रस्ता दुभाजकाजवळ प्रथमेश लाड हे दुचाकीस्वार दुचाकी क्रमांक एम एच १० डी यू ५०५२ दुचाकीसह थांबले होते. एन्डेवरचा वेग कमी होताच भरधाव येणा-या कंटेनरने एन्डेवरला जोरात धडक दिली.त्यामुळे एन्डेवर दुचाकीवर आदळली. दुचाकीसह विरूद्ध बाजूला गेली. त्याचवेळी छत्रपती संभाजी नगरकडे जाणा-या पुणे -संभाजीनगर एम एच ४९ बी झेड ८०६० या शिवाई बसने दुचाकीस एन्डेवरला उडविले. मोटारीच्या पुढील भागाचा चक्काचूर होवून उद्योजक किशोर यादव यांचा मृत्यू झाला.तर एन्डेवर व बसच्या मध्ये चिरडल्याने प्रथमेश लाड यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले किशोर यादव हे वाडेगव्हाण गावच्या सरपंच प्रियांका यादव यांचे पती असून उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने अल्पावधीतच नावारूपाला आले होते.