संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकम लढवणार; देवेंद्र फडणवीसांची माहिती
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता योग्य दिशेने चालना मिळेल, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीच्या आदेशाची प्रत सोशल मीडियावर शेअर करत याबाबत माहिती दिली. संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्यादृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जात आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांनी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी लावून धरण्यात आली होती. या मागणीला अखेर यश आले आहे.
उज्ज्वल निकम हे महाराष्ट्रातील अत्यंत नावाजलेले वकील आहेत. त्यांनी मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासारख्या महत्त्वाचे खटले लढवले आहेत.मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला फासावर लटकवण्यात उज्ज्वल निकम यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यामुळे उज्ज्वल निकम हे हायप्रोफाईल वकील म्हणून ओळखले जातात. संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या खटल्यात त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्याने वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
केज तालुक्यातील आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणातून संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. यामध्ये विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. तर या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा वाल्मिक कराड याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. या सगळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.