ऊसतोड कामगाराचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी दोघा भावांविरूद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बीड तालुक्यातील ऊसतोड कामगार बाळासाहेब घोडके याचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी दोघा ऊसतोड मुकादम भावांविरोधात केज येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिवराज हांगे , बाबूराव हांगे अशी गुन्हा दाखल झालेल्या ऊसतोड मुकादम भावांची नावे आहेत.
बीड तालुक्यातील ऊसतोड कामगार बाळासाहेब घोडके याचे केज येथील ऊसतोड मुकादम जिवराज केशव हांगे , बाबुराव केशव हांगे या दोघा भावांनी २९ ऑक्टोबर २०२१ रोजी सफेपूर येथील राहात्या घरातून चार चाकी वाहनातून अपहरण करून त्यास केज येथील शिक्षक कॉलनीतील तिस-या मजल्यावर डांबून ठेवले होते. ऊसतोड कामगार बाळासाहेब घोडके याचे अपहरण केल्यावर त्याच्या पत्नीस कारखान्यावरच गेल्यावर पतीस सोडण्याचे मुकादमाने सांगितल्याने ऊस तोड कामगार बाळासाहेब घोडके यांची पत्नी मीरा घोडके या त्यांचे ट्रॅक्टर व ऊसतोड कामगारांना घेवून साखर कारखान्यावर गेल्या होत्या. कारखान्यावर जाताना त्यांनी पतीस मोबाईल फोन केला. मात्र फोन दुस-या व्यक्तीने घेत पती कारखान्यावर गेल्याचे सांगितले.त्या कारखान्यावर गेल्यावर पती त्यांना मिळून आला नाही.
पतीचे केज येथे ऊसतोड मुकादम जीवनराज हांगे याच्या घरी तिस-या मजल्यावर संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मीरा बाळासाहेब घोडके यांना मिळाल्यावर त्यांनी ऊसतोड मुकादम जिवराज हांगे व बाबुराव हांगे या दोघांविरोधात केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.