• Total Visitor ( 702380 )
News photo

तिसरीच्या बालभारती पाठ्यपुस्तकात उत्तम सदाकाळ यांच्या 'हिरवा वसा' कवितेचा समावेश

Raju Tapal publisher May 27, 2026 78

तिसरीच्या बालभारती पाठ्यपुस्तकात उत्तम सदाकाळ यांच्या 'हिरवा वसा' कवितेचा समावेश



शिरूर:-राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यावर्षी तिसरीच्या नवीन अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात पुणे जिल्ह्यातील शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या मढ गावचे सुपुत्र,प्रसिद्ध साहित्यिक उत्तम सदाकाळ यांच्या "हिरवा वसा" या कवितेचा समावेश करण्यात आला असून हा अभ्यासक्रम येत्या जून पासून सुरू होत आहे. नवीन वर्षात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यावर्षी तिसरीच्या पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित कौशल्याधिष्टीत शिक्षणावर यात अधिक भर देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक शिक्षक उत्तम सदाकाळ यांच्या विविध साहित्य निर्मितीची महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने दखल घेत त्यांच्या हिरवा वसा कवितेचा समावेश तिसरीच्या बालभारती पाठ्यपुस्तकात केला आहे. येत्या जून पासून हा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार असून शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातून उत्तम सदाकाळ यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे. मुळ मढ (ता. जुन्नर) गावच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या उत्तम सदाकाळ यांच्या साहित्यकृतींची अभ्यासक्रम मंडळांने याआधीदेखील दखल घेत त्यांच्या 'पाऊस' या  कवितेची निवड दुसरीच्या 'खेळू करू शिकू' पुस्तकात केली होती. तसेच  समग्र शिक्षा व PM SHRI अंतर्गत त्यांच्या 'कमाई' या बालकथासंग्रहाची इयत्ता चौथी व पाचवीसाठी SCERT तर्फे ग्रंथालय योजनेत निवड झालेली आहे. जिल्हा परिषदेच्या  शाळेत विविध उपक्रमाद्वारे बालसाहित्यिक घडवत त्यांनी "निसर्गाची शाळा" या मुलांच्या कवितासंग्रहाचेही संपादन केले आहे. विविध वृत्तपत्रे,मासिके व दिवाळी अंकात कथा व कवितांचे लेखन करीत उत्तम सदाकाळ यांनी आजपर्यंत एकूण ९५ पुस्तकांचे लेखन केले असून त्यात बालसाहित्य,कथासंग्रह,कवितासंग्रह,कादंबरी आणि अनुवादासह त्यांनी विविधांगी लेखन केले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026