जेष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचे निधन
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- ग्रामीण साहित्य चळवळीचे चिंतक,भूमीनिष्ठ विचारक,जेष्ठ साहित्यिक भास्कर तात्याबा चंदनशिव यांचे लातूर येथे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले.
भास्कर चंदनशिव यांचा जन्म १२ जानेवारी १९४५ रोजी रोजी धाराशिव जिल्ह्यातील हासेगाव ता.कळंब येथे झाला होता. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी लेखनास सुरुवात केली होती. त्यांनी लिहिलेली 'लाल चिखल" ही कथा महाराष्ट्रातील घराघरात पोहचली. लातूरमधील खाजगी रूग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा शनिवारी मृत्यू झाला.
भास्कर चंदनशिव हे २८ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
त्यांचे प्राथमिक शिक्षण कळंब येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ते अंबाजोगाई येथे गेले. एम ए ची पदवी मिळविण्यासाठी ते छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. १९७२ मध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. २००५ साली बीड येथील बलभीम महाविद्यालयातून ते सेवानिवृत्त झाले. ते काही काळ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य होते.
आचार्य अत्रे पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशनचा ग्रामीण साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता.
जांभळढव्ह,मरणकळा,अंगार माती,नवी वारूळ,बिरडं हे त्यांचे कथासंग्रह गाजले आहेत. ग्रामीण जीवनातील दुष्काळ,शेतकरी जीवन, सामाजिक संघर्ष यावर त्यांनी लिखाण केले होते.