विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाचा झटका!
संपत्तीची जप्ती थांबवण्याची विनंती फेटाळली
नवी दिल्ली - भारतीय स्टेट बँकेला ९,००० कोटींचा चुना लावून परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टानं झटका दिला आहे. गुन्हेगार घोषीत करण्यापासून तसेच संपत्ती जप्त करण्याची कारवाई रोखावी, अशी विनंती याचिका त्यानं दाखल केली होती, ही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे.
विजय मल्ल्याला आर्थिक गुन्हेगार घोषीत करणे आणि त्याची संपत्ती जप्त करण्यासाठी मुंबईच्या स्थानिक कोर्टानं कार्यवाही सुरु केली आहे. ही कारवाई थांबवण्यात यावी, यासाठी मल्ल्याच्या वकिलानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण या याचिकेची दखल घेता येणार नाही, असं सांगत ही याचिका फेटाळून लावली.
सुप्रीम कोर्टानं मल्ल्याच्या याचिकेवरुन ७ सप्टेंबर २०१८ रोजी ईडीला नोटीस पाठवली होती. तसेच मुंबईत पीएमएलएच्या विशेष कोर्टासमोर तपास यंत्रणांच्या याचिकेवर कारवाईवर करण्यास नकार दिला. दरम्यान, या विशेष कोर्टानं पीएमएलए कायद्यानुसार ५ जानेवारी २०१९ रोजी विजय मल्ल्याला फरार घोषित केलं.
फरार घोषित झाल्यानंतर विजय मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये राहत असून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारनं प्रक्रिया सुरु केली आहे. पण अद्याप त्याला भारतात आणण्यात यश आलेलं नाही.