वीजचोरी प्रकरणी १२१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल; शहापूर व टिटवाळा उपविभागात कारवाई
टिटवाळा : वीजबिल थकीत ठेवून वीजचोरी करत महावितरणचे दुहेरी नुकसान करणाऱ्या शहापूर व टिटवाळा उपविभागातील तब्बल १२१ जणांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. या १२१ जणांविरोधात मुरबाड पोलीस ठाण्यात वीजचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
महावितरणच्या पथकाने शहापूर उपविभागातील शेणवा शाखा कार्यालयांतर्गत मळेगाव, कुडशेत, कवठेवाडी, लिंगायतपाडा, किन्हवली, रणविहीर, कोठारे, जळक्याची वाडी, खंडुची वाडी, कृष्णाची वाडी, मुसई वाडी, शिंदपाडा आदी भागात थकबाकीपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची तपासणी केली. या तपासणीत ६० जणांकडून विजेचा चोरटा वापर सुरू असल्याचे आढळले. तर टिटवाळा उपविभागातील गोवेली शाखा कार्यालयांतर्गत म्हसकळ, घोटसर, वसंतनगर, मामनोली, रायते, म्हारळ आणि वरप परिसरातल्या तपासणीत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित ३१ ग्राहकांकडून विजेचा चोरटा वापर सुरू असल्याचे आढळले.