"बीडमध्ये पिस्तुलांचं थैमान झालं असून एकट्या बीडमध्ये 1222 अधिकृत शस्त्र परवाने आहेत, तर अनधिकृत किती असतील? परभणीत 32 आणि अमरावती ग्रामीणमध्ये 243 शस्त्र परवाने आहेत. मग बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात का व कोणाच्या वरदहस्तानं परवाने दिलेत?"
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करत बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना कारवाई करण्याची विनंती केली.
हवेत गोळीबार करताना, कंबरेला कट्टा (पिस्तुल) बांधून फिरतानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हे व्हिडिओ बीडमधले असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आधीच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून चर्चेत असलेला बीड जिल्हा पुन्हा एकदा बंदूक परवान्यांमुळे चर्चेत आला आहे.या पार्श्वभूमीवर बंदुकीसाठी परवाना कसा मिळतोय? त्यासाठी नेमके काय निकष असतात? कोणाला बंदूक वापरण्याचा परवाना दिला जातो? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती बंदुक परवानाधारक आहेत? बीडच्या या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? जाणून घेऊयात.
शस्त्र परवाना दिला जाणाऱ्यांमध्ये पहिला क्रमांक लागतो पोलीस दल किंवा सैन्य दलातील अधिकारी, कर्मचारी यांचा. मात्र, हा परवाना देण्याबाबत विभाग प्रमुखाचे स्वयंस्पष्ट अभिप्रायासह असलेले ना-हरकत किंवा शिफारस पत्र देणं बंधनकारक असतं. तरच बंदूक परवाना मिळू शकतो.
याशिवाय कुठल्याही व्यक्तीच्या जीवाला धोका असेल असं वाटलं, तर ती व्यक्ती बंदूक परवान्यासाठी अर्ज करू शकते.
पण, यावेळी जो परवान्यासाठी अर्ज करतोय त्या व्यक्तीवर प्रत्यक्ष हल्ला झाला आहे किंवा हल्ल्याचा प्रयत्न झाला झाला आहे किंवा त्यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे याबाबत पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवून त्याची प्रत अर्जासोबत जोडावी लागते.
शस्त्र परवाना मिळणारा तिसरा वर्ग म्हणजे जंगली प्राण्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठीही बंदुकीचा परवाना मिळतो. यासाठी चालू वर्षाचा 7/12 उतारा आणि 8 अ चा अद्यावत उतारा सादर करणं गरजेचं असतं.
चौथा वर्ग म्हणजे नेमबाज खेळासाठीही बंदुकीचा परवाना दिला जातो. राष्ट्रीय खेळाडू असेल किंवा इच्छूक शूटर असेल त्याचा मागील 2 वर्षात नेमबाज स्पर्धेत सहभाग घेतल्याचं प्रमाणपत्र जोडावं लागतं.
हे प्रमाणपत्र Certifying body ने प्रमाणित केलेलं असावं. तसेच ज्याठिकाणी सराव करतात त्या क्लबचं ओळखपत्र किंवा मेंबरशिप कार्ड सुद्धा जोडावं लागतं.
पहिला आणि महत्वाचा निकष म्हणजे शस्त्र परवान्यासाठी अर्ज करणारी व्यक्ती भारताची रहिवासी असणं गरजेचं आहे. तसेच ज्या व्यक्तीला शस्त्र परवाना हवा आहे ती व्यक्ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं असतं.
त्या व्यक्तीला कुठल्याही गुन्ह्यात अटक, शिक्षा झालेली नाही आणि कुठल्याही कोर्टात प्रकरण प्रलंबित नसावं. अर्ज करताना संबंधित व्यक्तीनं वयाची 21 वर्षे पूर्ण केलेली असावीत.
प्रशिक्षणासाठी खेळाडूला जर परवाना हवा असेल, तर 12 वर्षांच्या मुलांनाही परवाना मिळू शकतो. पण, त्यासाठी ज्या व्यक्तीकडे कायदेशीर परवाना आहे त्यांच्या उपस्थितीतच प्रशिक्षण घेणं बंधनकारक असतं.
शस्त्र परवाना आर्म्स अॅक्ट 2016 नुसार दिला जातो. ज्या ठिकाणी आपल्याला शस्त्र हवं आहे तिथल्या पोलीस उपाधीक्षकांच्या नावानं ऑनलाइन अर्ज करता येतो.
यासाठी शिधापत्रिकेची प्रत, निवडणूक ओळखपत्र, गेल्या 3 वर्षातील आयकर विवरण पत्र, राहतो त्या परिसरातील दोन प्रतिष्ठित नागरिकांकडून चारित्र्य प्रमाणपत्र, शारिरीक सक्षमता प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेसंबंधी पुरावा, वयाचा पुरावा, सुरक्षिततेसाठी किंवा खेळासाठी शस्त्राची गरज असल्याचं समर्थन पत्र इत्यादी कागदपत्रं शस्त्र परवान्याच्या अर्जासोबत जोडावे लागतात.
अर्ज मिळाल्यावर त्या व्यक्तीच्या विरोधात कुठलाही गुन्हा दाखल आहे का याची चौकशी केली जाते. संबंधित व्यक्तीची सगळी माहिती काढून त्याचं रेकॉर्ड कसं आहे ही माहिती घेतली जाते. ज्या व्यक्तीला परवाना पाहिजे त्याची पोलीस उपायुक्त मुलाखत घेतात.
त्यानंतर पोलीस उपायुक्त तो अहवाल एनआरबीला आणि गुन्हे शाखेला पाठवतात. सगळ्या अटींची पुर्तता झाल्यानंतर पोलीस उपायुक्त किंवा पोलीस अधीक्षक शस्त्राचा परवाना देऊ शकतात.
बीडमध्ये इतके शस्त्र परवानाधारक कसे काय? असा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केला. त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, "हे परवाने काही आता दिलेले नाहीत. वर्षानुवर्ष लोकांनी घेतलेले हे परवाने आहेत. ते योग्य प्रकारे दिले गेले आहेत की नाही यासंदर्भात काही तक्रार आली, तर आम्ही विचार करू."
नागपुरात 25 डिसेंबरला 'मीट द प्रेस' कार्यक्रम झाला तेव्हा फडणवीसांनी हे उत्तर दिलं.
अलीकडच्या काळात कंबरेला देशी कट्टा लावून फिरतानाचे रील्स, बंदूक घेऊन हवेत गोळीबार करतानाचे रील्स समोर येत आहे.
परवाना असलेल्या शस्त्राचं असं जाहीर प्रदर्शन करता येतं का? आणि हे असले प्रकार का वाढत आहेत? यावर बोलताना राज्य गुप्तचर विभागाचे माजी अतिरिक्त पोलीस आयुक्त शिरीष इनामदार म्हणाले, "गुन्हेगारी प्रवृत्तीचं गौरवीकरण करण्याची प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. त्यामुळे हे प्रकार वाढत आहेत."
"परवाना मिळालेल्या शस्त्राचं असं जाहीर प्रदर्शन करणं कायद्यानं गुन्हा आहे. पण, कारवाई होत नाही म्हणून अशी गुंड किंवा हिंसक प्रवृत्ती दिसून येते. स्वसुरक्षेसाठी बंदुकीचा परवाना मिळाला असेल, त्याची कागदोपत्री नोंद असली, तरी त्या व्यक्तीच्या जीवाला खरोखर धोका आहे का? याची शहानिशा होत नाही."
"ज्याचा वशिला असेल त्याला परवाना मिळतो. बंदूक, शस्त्र ही प्रदर्शन करण्याची वस्तू झाली आहे. खोट्या प्रतिष्ठेचं प्रतिक आहे. बंदूक दाखवणं म्हणजे प्रतिष्ठा, रुबाब हा शुद्ध अडाणीपणा आहे. ज्यांच्या जीवाला धोका आहे त्यांचे कारनामे तसेच आहेत म्हणून जीवाला धोका वाटतो. सामान्य माणसांच्या जीवाला कधीच धोका नसतो."
केंद्रीय गृहमंत्रालयानं 2018 मध्ये जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतात एकूण 35 लाख 87 हजार 016 लोकांकडे शस्त्रांचा परवाना आहे.
या आकडेवारीत सगळ्यात जास्त आघाडीवर उत्तर प्रदेश असून तिथं 12 लाख 88 हजार 459 लोकांकडे शस्त्र परवाना आहे. त्या खालोखाल पंजाब, मध्य प्रदेश आणि हरयाणाचा क्रमांक लागतो.
महाराष्ट्रात 93 हजार 520 लोकांकडे शस्त्राचा परवाना आहे, तर बिहारचा नंबर सगळ्यात शेवटचा आहे. बिहारमध्ये 81 हजार 516 लोकांकडे शस्त्राचा परवाना आहे.
द वायरनं 2023 मध्ये माहितीच्या अधिकाराखाली शस्त्र परवानाधारकांची यादी मागवली होती. त्यांना आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात सर्वाधिक बंदुकीचे परवाने असून त्याखालोखाल जम्मू-काश्मीर आणि पंजाबचा क्रमांक लागतो.