सीरियामध्ये अनेक दिवसांपासून गृहयुद्ध सुरू होतं. 8 डिसेंबर 2024 इस्लामिक बंडखोर गटानं अलेप्पो, हमा आणि होम्स शहरांनंतर राजधानी दमास्कसवर ताबा मिळवला. त्यानंतर, बंडखोरांनी सीरियाच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.
राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद हे अज्ञातस्थळी पळून गेल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्यांनी मॉस्कोमध्ये आश्रय घेतल्याची माहिती रशियन सूत्रांच्या हवाल्यातून मिळाली.
काल सोमवारी म्हणजे 9 डिसेंबर रोजी लोक आपल्या नातलगांच्या, मित्रांच्या शोधासाठी देशातल्या कुप्रसिद्ध कारागृहाजवळ एकत्र आले. त्याआधी बंडखोरांनी या कुप्रसिद्ध सेडनाया जेलवर ताबा मिळवला होता.
या जेलमध्ये तळघरांमधील बंदीखोल्यांमध्ये लोकांना डांबलं आहे, असा अनेक जणांचा दावा आहे.
सीरियातला सिव्हिल ग्रुप व्हाईट हेल्मेटस त्यावर अधिक तपास करत आहे.
या तळघरांमध्ये जाण्याचा प्रयत्न लोक कसा करत आहेत, हे दाखवणारे व्हीडिओ अल जझिरासारख्या माध्यमांद्वारे प्रदर्शित होत होते.
अशाच एका व्हीडिओची सत्यता पडताळून वृत्तसंस्था एएफपीने सीरियातले अनेक लोक आपल्या आप्तांच्या शोधासाठी कारागृहाच्या दिशेने जात आहेत असं म्हटलं आहे.
हे जेल असद प्रशासनामध्ये अत्यंत कुप्रसिद्ध होतं. असं म्हटलं जायचं की प्रशासनाला विरोध करणाऱ्या हजारो विरोधकांना इथं मृत्यूदंड दिला गेला आणि अनेक लोकांना क्रौर्याला सामोरं जावं लागलं.
अरबी आणि सीरियन वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार मोहम्मद अल बशीर हे सीरियाचे अंतरिम पंतप्रधान म्हणून सरकार चालवण्याची शक्यता आहे. काही काळ तेच देश सांभाळतील.
"आम्ही सीरियामधील घटनांवर लक्ष ठेवून आहोत," अशी प्रतिक्रिया भारतातर्फे देण्यात आली आहे."
रशियन सरकारी माध्यमाने बशर अल असद आणि त्यांच्या कुटुंबाला रशियात आसरा दिल्याचं स्पष्ट केलं आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दमित्रि पेस्कोव्ह म्हणाले, राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी वैयक्तिक पातळीवर हा निर्णय घेतला आहे.
तिकडे सीरियात असद कुटुंब पळाल्यानंतर बंडखोरांनी, स्थानिक लोकांनी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर जाऊन लुटालूट केली आणि फोटोही काढले.
सीरियात निर्माण झालेल्या स्थितीचा इस्लामिक स्टेट म्हणजे आयसीसला फायदा घेऊ देणार नाही असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन म्हणाले आहेत.
सीरियन माध्यमांच्या माहितीनुसार इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कससह देशातल्या अनेक जागांवर असलेल्या लष्करी तळांवर हल्ले केले आहेत.
ब्रिटनमध्ये असलेल्या सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइटसने सीरियात लष्करी तळांवर 100 पेक्षा जास्त हल्ले झाल्याचं सांगितलं आहे.
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार इस्रायलने रासायवनिक अस्त्रं करणाऱ्या एका संशयास्पद संशोधन केंद्रावरही हल्ले केले आहेत.
सीरियातल्या बंडामुळे सरकार गेल्यावर तो देश कट्टरतावाद्यांच्या हातात जाऊ नये म्हणून आपण हल्ले करत असल्याचं इस्रायलनं सांगितलं आहे.
सोमवार 9 डिसेंबररोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक झाली त्यात सीरियाच्या सध्यस्थितीवर चर्चा झाली.