हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट म्हणजे काय?
मुंबई - केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या निर्देशांनुसार, एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अर्थात (उच्च सुरक्षा क्रमांक पाटी) बंधनकारक करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव २०१९ पूर्वीच्या वाहनांच्या नंबरप्लेट बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता २०१९ पूर्वीच्या वाहनांच्या नंबरप्लेट नागरिकांना बदलाव्या लागणार आहेत. तसेय या पार्श्वभूमीवर सध्या प्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओकडून देखील अंमलबजावणी करण्यासाठी पावलं उचलण्यात येत आहेत. मात्र, हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) म्हणजे काय? तसेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनांना बसवण्यासाठी किती तारखेपर्यंत मुदत आहे? तसेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी काय प्रोसेस करावी लागते? याविषयीची माहिती वाचा..
एचएसआरपी म्हणजे काय?
एचएसआरपी किंवा हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स ही अॅल्युमिनियमपासून बनवलेली नंबर प्लेट आहे. या नंबर प्लेटच्या डाव्या कोपऱ्यात एक यूनिक लेसर ब्रँडेड १० अंकी पिन दिलेला असतो. ही पाटी ॲल्युमिनियमपासून बनवलेली असून १.१ मिमी एवढा तिचा आकार असतो. तसेच त्या नंबर प्लेटवर एक होलोग्राम जोडण्यात आला असून तो क्रोमियम आधारित आहे. स्टिकरप्रमाणे दिसणाऱ्या होलोग्राममध्ये वाहनांचा सर्व तपशील ऑनलाइन नोंद होतो. सर्वात महत्वाचं म्हणजे ही नंबर प्लेट बनावट पद्धतीने बनवता येत नाही. तसेच भारत सरकारने एप्रिल २०१९ नंतर विकल्या गेलेल्या प्रत्येक वाहनावर एचएसआरपी वापरणे अनिवार्य केलं आहे. तसेच रस्ते आणि वाहनांच्या संबंधित गुन्ह्यांमध्ये घट करण्याच्या दिशेने हा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, ३१ मार्चच्या आधी गाडीला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स बसवून घ्यावी लागणार आहेत.
एचएसआरपी नंबर प्लेट कशी बसवावी?
एचएसआरपी नंबर प्लेट मिळवण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्राच्या परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन प्रोसेस करावी लागते. तसेच पोर्टलवर आवश्यक ती माहिती सबमिट करावी लागते. वाहन आणि फोनचे तपशील वाहन पोर्टलवरील तपशीलाशी जुळले पाहिजेत याची नोंद घ्यावी लागते.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी काय प्रोसेस करावी?
हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट ओपन करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तेथील डिटेल्स अर्थात वाहनाचा क्रमांक, वाहनाच्या चेसीचा क्रमांक, पत्ता वैगेरे अशी माहिती भरावी लागेल. तसेच तुम्ही तुमचा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला त्याची पावती देखील डाऊनलोड करता येईल. ही प्रोसेस केल्यानंतर पुढील काही दिवसांत तुमची हाय सिक्युरिटी नंबर प्लेट मिळेल.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर काय नमूद असते?
हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या दर्शनी भागावर डाव्या कोपऱ्यात 'IND' ही अक्षरे नमूद असून त्याचा आकार वाहन क्रमांकाच्या एक चतुर्थांश ठरविण्यात आला आहे. २० मिमी आकाराचे क्रोमियम-आधारित अशोक चक्र आहे. ते 'हॉट स्टॅम्पिंग'द्वारे छापण्यात आले आहे. पाटीसाठी विशेष दहा आकड्यांचा वेगळा क्रमांक देण्यात आला आहे. पाटीवरील मजकूर जास्त होऊ नये म्हणून हे अंक 'रिफ्लेक्टिव्ह शीट'वर 'लेसर ब्रँड' केले आहेत. ते पाटीच्या खाली डाव्या बाजूला प्रकाशित करण्यात आले असून या अंकांसाठी ५ मिमी जागा निश्चित करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वाहन खरेदी करताना 'आरटीओ' नोंदणी प्राधिकरण, वाहनधारकाचे नाव, मोबाइल क्रमांक, इंजिन क्रमांक, वाहन क्रमांक, नाव, पत्ता आदी माहिती संगणकीकृत करण्यात आली आहे.