पोलिस भरतीच्या आमिषाने तरुणाला ५ लाखांचा गंडा
मोरोशीच्या तरुणाची फिर्याद
सिंधुदुर्गातील एकावर गुन्हा
राजापूर :- पोलिस भरतीचे आमिष दाखवून त्यासाठी लष्करी अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागतात, असे सांगून मोरोशी (ता. राजापूर) येथील एका तरुणाला तब्बल ४ लाख ९० हजार ९०६ रुपयांना फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राजापूर पोलिस स्थानकात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेर्पे (ता. कणकवली) येथील ज्ञानेश वसंत पांचाळ (३२) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फसवणूकप्रकरणी लवेश यशवंत कानडे (२८, रा. मोरोशी-गावकरवाडी, राजापूर, सध्या रा. अंबिकानगर, जोगेश्वरी पूर्व) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हा प्रकार डिसेंबर २०२० पासून १२ ऑगस्ट २०२४ दरम्यान घडला आहे. लवेश कानडे हा पदवीधर असून, सध्या नोकरी करीत आहे. त्याची ज्ञानेश पांचाळ याच्याशी ओळख झाली होती. त्याने लवेश याला पोलिस दलात नोकरी लावतो, असे सांगून त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने पोलिस भरतीसाठी विजय सुतार नावाच्या लष्करी अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागतील, असे सांगितले आणि लवेश याच्याकडून ४ लाख ९० हजार २०६ रुपये घेतले. मात्र, त्यानंतर त्याने नोकरीला लावले नाही, तसेच पैसे घेऊन आर्थिक फसवणूक केल्याचे लक्षात आले.