• Total Visitor ( 707965 )
News photo

निंभा येथून ‘सेवा संकल्प अभियान २०२६’चा दिमाखात शुभारंभ

Raju Tapal publisher September 18, 2026 15

निंभा येथून ‘सेवा संकल्प अभियान २०२६’चा दिमाखात शुभारंभ



विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव,सामाजिक बांधिलकी व जबाबदार नागरिकत्वाची जाणीव रुजविण्यासाठी महिनाभर विविध उपक्रम



भातकुली 



विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव,सामाजिक जबाबदारी आणि समाजाप्रती बांधिलकीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान २०२६’चा शुभारंभ गुरुवारी (दि.१७) भातकुली पंचायत समिती अंतर्गत जि.प.पू.माध्यमिक शाळा,निंभा येथे उत्साहात करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सुनिल राणा यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके होते. प्रमुख उपस्थिती म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी,उमेश ढोने (रवीभाऊ राणा यांचे स्वीय सहायक),युवा स्वाभिमानचे भातकुली तालुकाध्यक्ष मंगेशभाऊ इंगोले,श्रीकृष्ण बैलमारे,गटविकास अधिकारी तृप्ती दुरुगकर,गटशिक्षणाधिकारी रामेश्वर माळवे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.खरात,निंभाचे माजी सरपंच नितेशभाऊ गुडधे व अविनाशभाऊ सनके उपस्थित होते.



महिनाभर सामाजिक उपक्रमांची रेलचेल



१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. ‘विकसित भारत–२०४७’ या संकल्पनेवर आधारित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून,२ ऑक्टोबर रोजी प्रत्येक तालुक्यात ‘नमो सेवागाथा’ कार्यक्रम घेण्यात येणार आहे.



अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता,वृक्षारोपण,प्लास्टिकमुक्ती,जलसंवर्धन,रस्ता सुरक्षा,सायबर सुरक्षा,फिट इंडिया,वीरगाथा,दिव्यांगजन सहाय्य,मतदार जागृती,व्होकल फॉर लोकल, व्यसनमुक्ती,पोषण व ॲनिमिया जनजागृती अशा विविध विषयांवर जनजागृतीपर उपक्रम राबविले जाणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, डिजिटल साक्षरता आणि वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहकार्य यांसारखे उपक्रमही आयोजित केले जाणार आहेत. प्रत्येक शाळेने स्थानिक गरजा लक्षात घेऊन किमान एका अर्थपूर्ण सेवा उपक्रमाची अंमलबजावणी करावी,अशा सूचना देण्यात आल्या आहेत.



‘मी समाजासाठी काय करू शकतो?’ ही भावना रुजविण्याचा प्रयत्न



विद्यार्थी,शिक्षक,पालक,शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये ‘मी समाजासाठी काय करू शकतो?’ हा विचार रुजविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग ऐच्छिक राहणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तृप्ती दुरुगकर यांनी केले. सूत्रसंचालन शैलेन्द्र दहातोंडे यांनी,तर आभार प्रदर्शन निलेश भुयार यांनी केले. यावेळी गावकरी,शिक्षकवृंद,विद्यार्थी व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



‘सेवा संकल्प अभियान २०२६’च्या शुभारंभप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुनिल राणा यांच्या हस्ते उद्घाटन करताना उपस्थित मान्यवर. आजपासून सुरु झालेल्या सेवा संकल्प अभियान कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन केल्याबद्दल अभिनंदन करतांना मा.सुनिलभाऊ राणा (सामाजिक कार्यकर्ते) यावेळी उपस्थित मा.तृप्ती दुरुगकर मॅडम (गटविकास अधिकारी,पं.स. भातकुली)व मा. रामेश्वर माळवे साहेब (गटशिक्षणाधिकारी,पं.स.भातकुली ).


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement