टिटवाळ्यातील समाजसेवकांकडून दिशर्यमच्या मदतीचा ओघ...
दुर्दैवी आई-वडिलांची हृदयस्पर्शी कहाणी ऐकून अनेकांचे पाझरले मन,चिमुकल्याच्या उपचारांसाठी मदतीचे हात सरसावले...
राजू टपाल
टिटवाळा : एका दोन वर्षांच्या पोटच्या लेकीला गमावलं... आता चिमुकल्या मुलाच्या जीवासाठी आई-वडिलांची धडपड... साडेतीन वर्षांच्या दिशर्यमला वाचवण्यासाठी माणुसकीच्या मदतीची आर्त हाक... ही हृदय पिळवटून टाकणारी कहाणी ऐकून टिटवाळ्यातील अनेक संवेदनशील नागरिकांचे मन हेलावले असून,दिशर्यमच्या उपचारांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे.टिटवाळ्यातील मधुबन सोसायटीच्या मागे असलेल्या पिंपळेश्वर मंदिराजवळील एका चाळीत भाड्याच्या खोलीत राहणारे आणि मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील खिरविरे गावचे रहिवासी असलेले कविता आणि अनिल बाळू पराड या दाम्पत्याची आपल्या चिमुकल्या मुलाला वाचवण्यासाठी सुरू असलेली धडपड टिटवाळा न्यूजने सचित्र व्हिडिओ बातमीच्या माध्यमातून समाजासमोर मांडली होती.'एका दोन वर्षांच्या लेकीला गमावलं...आता लेकाला वाचविण्याची धडपड...या हृदयस्पर्शी बातमीने संपूर्ण टिटवाळा शहरासह परिसरातील नागरिकांना भावूक केले. पराड दाम्पत्याने यापूर्वी आपल्या दोन वर्षीय आकांक्षाला गमावले आहे. या दुःखातून आई-वडील अद्याप सावरलेही नसताना साडेतीन वर्षांच्या दिशर्यमची प्रकृती खालावल्याने त्यांच्या कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.सध्या दिशर्यमवर मुंबईतील वाडिया रुग्णालयात उपचार सुरू असून,मुलाच्या उपचारांसाठी पराड कुटुंबीयांची आर्थिक परिस्थितीशी सुरू असलेली झुंज अत्यंत कठीण बनली आहे. ही परिस्थिती आणि आई-वडिलांची आर्त हाक टिटवाळा न्यूजच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचताच अनेक मदतीचे हात पुढे आले.या सामाजिक मदतकार्यात समाजसेवक अॅडव्होकेट जितेंद्र जोशी,प्रभाकर भोईर,पत्रकार राजू टपाल,समाजसेवक महेश एगडे,साबीरभाई शेख,प्रफुल्ल उबाळे,राज पुरोहित (बिकानेर स्वीट्स),संदीप गायकवाड,अविनाश भालेकर,राहुल कांगणे,बाळाराम कोर,निकितेश भानुशाली,संपत घुले,हरीश कांबळे, सतबीरसिंग बिस्त यांच्यासह अनेक दानशूर व्यक्तींनी आपल्या परीने आर्थिक मदतीचा हात पुढे केला.मिळालेली मदत कितीही छोटी असली, तरी संकटात सापडलेल्या कुटुंबासाठी ती मोठा आधार ठरत आहे. 'फुल ना फुलाची पाकळी' म्हणून मिळालेल्या या मदतीमुळे पराड कुटुंबीय अक्षरशः गहिवरून गेले आहेत. कठीण प्रसंगी माणुसकीच्या नात्याने धावून आलेल्या सर्व दात्यांचे त्यांनी मनापासून आभार मानले आहेत.दुःखाच्या काळोखात माणुसकीचा एक आशेचा किरण चमकला आहे. आता टिटवाळ्यातील नागरिकांच्या मदतीने दिशर्यमला नवजीवन मिळावे,हीच सर्वांची प्रार्थना!