आसनगाव रेल्वे पोलिसांकडून ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचे आयोजन...
‘डिजिटल एकता,सुरक्षित भविष्य’चा संदेश देत सायबर जनजागृती,विद्यार्थी,पोलीस कर्मचारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग...
राजू टपाल.
आसनगाव :- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून तसेच नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी आसनगाव रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवार,दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी ७.१० ते ७.५५ या वेळेत आसनगाव रेल्वे पोलीस ठाणे ते मुंबई-आग्रा महामार्गावरील परिवार हॉटेल आणि पुन्हा आसनगाव रेल्वे पोलीस ठाणे असा मॅरेथॉनचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. या उपक्रमातून ‘डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य’ हा संदेश देत नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले.मॅरेथॉनदरम्यान सायबर जनजागृतीचे बॅनर आणि माहितीपत्रकांच्या माध्यमातून ऑनलाइन फसवणूक,डिजिटल व्यवहारांमधील सुरक्षितता आणि सायबर गुन्ह्यांपासून बचाव याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथही देण्यात आली.या कार्यक्रमाला आसनगाव रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लोंढे यांच्यासह ५ पोलीस अधिकारी,२७ पोलीस अंमलदार,गाज पोलीस अकॅडमी आसनगावचे ३८ विद्यार्थी तसेच १० रेल्वे प्रवासी सहभागी झाले होते.यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लोंढे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांना मार्गदर्शन करताना सायबर गुन्ह्यांपासून सतर्क राहण्याचे तसेच डिजिटल व्यवहार करताना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले.राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यासोबतच सायबर सुरक्षिततेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.