• Total Visitor ( 757150 )
News photo

आज १ नोव्हेंबर जेष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांचा जन्मदिवस...

Raju Tapal publisher November 01, 2026 25

आज १ नोव्हेंबर जेष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांचा जन्मदिवस...



 मराठी रंगभूमी,चित्रपट आणि रसिकांच्या मनावर आपल्या सहजसुंदर विनोदी अभिनयाची अमिट छाप उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते शरद तळवळकर यांचे स्मरण झाले की चेहऱ्यावर नकळत हसू उमटते आणि मन जुन्या आठवणींमध्ये रमून जाते. त्यांच्या अभिनयात कोणताही आडपडदा नव्हता. साधी देहबोली,बोलण्याची खास लकब, चेहऱ्यावरचे निरागस भाव आणि संवादफेकीतील सहजता यामुळे त्यांनी साकारलेली प्रत्येक व्यक्तिरेखा जिवंत होत असे. त्यांचा विनोद कधीही केवळ हसवण्यासाठी नव्हता; त्यामध्ये माणसांचे स्वभाव,दैनंदिन जीवनातील गंमती-जमती आणि समाजाचे सूक्ष्म निरीक्षण दडलेले असे. ‘लाखाची गोष्ट’,‘पेडगावचे शहाणे’,‘तुळस तुझ्या अंगणी’,‘रंगल्या रात्री अशा’ ‘अखेर जमलं’,‘वाट चुकलेले नवरे’,‘बायको माहेरी जाते’,‘मुंबईचा जावई’ आणि ‘एकटी’ अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. ‘जावई विकत घेणे’मधील म्हाताऱ्याच्या भूमिकेचे आणि ‘एकटी’तील भूमिकेबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले होते. कॉमेडीच्या नावे ओढून ताणून पांचट विनोद करून,कृत्रिम हास्य फुलवण्याचा प्रयत्न,सध्या आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळतो. मराठी असो वा हिंदी मनोरंजन वाहिनी,एक तरी कॉमेडी शो असतोच असतो. मात्र,कॉमेडीच्या दुनियेत एक बादशाह असा होऊन गेला,ज्याचा केवळ चेहरा समोर आला तरी आपोआप हसू येत असे. त्याने डायलॉग मारला की हसून हसून पोट धरावं लागे. ना त्याच्या डायलॉगमध्ये कृत्रिमपणा होता,ना ओढून ताणून जुळवलेले शब्द. तो होता खराखुरा विनोदवीर म्हणजेच दिग्गज अभिनेते शरद तळवलकर. शरद तळवलकर हे मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध आणि दिवंगत अभिनेते असून त्यांनी सिनेमामध्ये अनेक विनोदी भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी काही सिनेमात खलनायकाची भूमिकाही साकारलेली. मात्र,त्यांना विनोदी अभिनेता म्हणून ओळख मिळाली. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९१८ रोजी झाला. शालेय जीवनात  पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ‘रणदुंदुंभी’ नाटकातील शिशुपाल आणि ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकातील भद्रायु भाटकर ही पात्र त्यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगविली होती. इथूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली. कित्येकदा लहान-मोठी किंवा अगदी पडदा उघडताना ऐनवेळी अशा भूमिका रंगवून त्यांनी आपले नाव नाट्यवर्तुळात सर्वतोमुखी केले. पुढे केशवराव दात्यांच्या ‘नाट्यविकास’ मंडळीत त्यांनी नोकरी केली. ‘छापील संसार’ नावाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले. हा अभिनयाचा छंद जोपासत असताना त्यांनी ‘मिलिटरी अकाउंट्स’ मध्ये नोकरी केली. विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता ‘माझा मुलगा’ तिथून सुरू झालेला विनोदी अभिनेत्याचा प्रवास शेवटपर्यंत सुरूच होता. नाट्य आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रांत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. बालगंधर्वांसारख्या नटश्रेष्ठाबरोबर ‘एकच प्याला’तील रंगवलेली तळीरामाची भूमिका बालगंधर्वांच्या शाबासकीला पात्र ठरली. ‘लग्नाची बेडी’ या नाटकातला गोकर्ण शरद तळवलकरांनी आपल्या ठसकेबाज शैलीत रंगवून अविस्मरणीय केला. पुणे आकाशवाणी केंद्रावर नाट्यनिर्माते म्हणून केलेले त्यांचे कार्य मोलाचे होते. त्यांच्या काळातील नभोनाट्ये हा श्रोत्यांच्या आवडीचा विषय होता. ‘कलाकार’ ही नाट्यसंस्था त्यांनी उभारली. ‘मुंबईचा जावई’ या चित्रपटात त्यांनी केलेली भूमिका वास्तवाशी निगडित असून खूपच सुंदर होती. अतिशय बोलक्या चेहर्‍याच्या या विनोदी कलावंताला नाट्यसृष्टीत मानाचा समजला जाणारा ‘विष्णूदास भावे’ पुरस्काराने गौरविले गेले. ‘मुंबईचा जावई’,‘धाकटी मेहुणी’,‘आली अंगावर’,‘नवरे सगळे गाढव’,‘चांदणे शिंपीत जा’,‘थोरली जाऊ’, ‘गडबड घोटाळा’ आदी चित्रपटांतील त्यांच्या विनोदी भूमिका गाजल्या. ‘धुमधडाका’मध्ये शरद तळवलकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रंगवलेला चित्रपटाची कथा सांगण्याचा प्रसंग तर कोण विसरेल? ‘एकटी’,‘लेक चालली सासरला’,‘अष्टविनायक’,‘कैवारी’ या चित्रपटांतील चरित्र भूमिकाही त्यांनी अजरामर केल्या.‘मी रंगवलेले म्हातारे’ आणि ‘गुदगुल्या’ या त्यांच्या पुस्तकांना राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला. १९५० च्या काळात शरद तळवलकर पुणे विद्यापीठात कुलगुरुंचे खाजगी सचिव म्हणून कार्यरत होते. याशिवाय ते एस.पी. कॉलेजमध्ये नाटकं आणि एकांकिकांचं दिग्दर्शन करायचे. त्यातूनच त्यांची उषा वाटवे यांच्याशी ओळख झाली. उषा ही एस.पी. कॉलेजमधील प्राध्यापकांची मुलगी. शरद आणि उषाची ओळक झाली मग पुढे या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. २० ऑक्टोबर १९५० रोजी शरद आणि उषा यांचा विवाह झाला. लग्नानंतर उषा वाटवे  यांची पूर्णिमा तळवलकर झाली. उषा वाटवे या उत्तम शास्त्रीय गायिका होत्या. शरद तळवलकर यांना उमेश आणि हेमंत अशी दोन मुलं असून त्यांचा एक मुलगा हेमंत यांनी १९७७-८० या काळात रणजी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं.पण त्यानंतर ते परदेशात गेले. हेमंत यांचा मुलगा कपिलचा जन्म अमेरिकेतच झाला असून त्याचं आजोबांसोबत म्हणजेच शरद यांच्यासोबत खास बॉण्डिंग होतं. कपिलने शाळा आणि कॉलेजमध्ये असताना नाटकामध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढे त्यानं युनिव्हर्सिटीमधून अभिनय आणि संगीताचं शिक्षण घेतलं. आता कपिलने हॉलिवूडमध्ये अभिनेता,संगीतकार,पटकथाकार,लेखक अशी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. कपिलला 'अमेरिकन प्रिन्सेस' या सिनेमातून हॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. त्याचबरोबर तो 'झोयास एक्सट्रा ओर्डीनरी', 'ख्रिसमस चार्म सिरीजच्या 4' सीजनमध्येही झळकला होता. इतकंच नव्हे तर कपिल 'सेशन 19' या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसला. शरद तळवलकर यांच्या बद्दल पु.ल. म्हणत असत “शरद तळवलकर हा माणूस इतका साधा आहे की,यांच्या नावात काना,वेलांटी,उकार काहीच नाही हो.  अशा या विनोदी अभिनेत्याचे २१ ऑगस्ट २००१ रोजी निधन झाले. आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या असंख्य भूमिका,संवाद आणि चेहऱ्यावरचे ते मिश्कील भाव पुन्हा पुन्हा आठवतात. काळ पुढे गेला,मनोरंजनाची साधने बदलली;पण शरद तळवळकर यांच्या अभिनयातून मिळालेला निर्मळ आनंद आजही तितकाच ताजा आहे. हास्याच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या महान कलाकाराला  विनम्र अभिवादन! 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement