एक पुरोगामी विचार काळाच्या पडद्याआड
डाॅ.रत्नाकर महाजन यांच्या निधनाबद्दल सेवानिवृत्त प्राध्यापक,दैनिक सकाळचे जेष्ठ पत्रकार प्रा.नागनाथराव शिंगाडे यांची प्रतिक्रिया
विजय ढमढेरे
शिरूर:- एक पुरोगामी विचार काळाच्या पडद्याआड गेला आहे.पुरोगामी विचारांच्या चळवळीतील एक अभ्यासू,लढवय्या,वैचारिक नेतृत्व हरपले अशी प्रतिक्रिया काॅंग्रेसचे जेष्ठ नेते, राज्य नियोजन मंडळाचे माजी अध्यक्ष डाॅ.रत्नाकर महाजन यांच्या निधनाबद्दल सेवानिवृत्त प्राध्यापक,दैनिक सकाळचे तळेगाव ढमढेरे येथील जेष्ठ पत्रकार नागनाथराव शिंगाडे यांनी व्यक्त केली आहे. मूळ इंदापूरचे सध्या वास्तवास पुण्यामध्ये असलेले ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन (वय ८०) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. डाॅ.रत्नाकर महाजन यांच्या निधनानिमित्त त्यांचा अल्पपरिचय सांगताना प्रा.नागनाथराव शिंगाडे सर यांनी सांगितले,१४ जून १९४६ रोजी इंदापूर (जि.पुणे) येथे त्यांचा जन्म झाला. १९६४ ला इंदापूर येथे शालांत शिक्षण पूर्ण केले. १९६४-६७ मध्ये नाशिक येथे महाविद्यालयीन (वैद्यकीय) शिक्षण पूर्ण. याच काळात त्यांनी सार्वजनिक कार्यास प्रारंभ केला. विद्यार्थी चळवळीत त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलने केली. वाद विवाद स्पर्धा,परिषदा व सभांचे आयोजन केले. नाशिक येथील वसंत व्याख्यानमालेचा सहचिटणीस म्हणून काम पाहिले. गावकरी या वृत्तपत्रातून सामाजिक व राजकीय लेखन केले. १९६९ मध्ये वैद्यकीय पदवी मिळवली. धुळे, नाशिक व मुंबई येथे सरकारी व निम सरकारी दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा केली. १९७१ मध्ये युवक क्रांती दलाचा सक्रिय सदस्य,याच काळात युक्रांदच्या विविध आंदोलनात सहभाग व तुरुंगवास. १९७२ मध्ये दुष्काळग्रस्त समितीच्या वतीने मराठवाडा व खानदेशातील दुष्काळग्रस्तांसाठी गेलेल्या वैद्यकीय पथकात सक्रिय सहभाग. १९७३ मध्ये मुंबईच्या चिल्ड्रन्स एड सोसायटीतील वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा देऊन पुण्यात स्थायिक झाले. १९७३-७५ काळात युक्रांदचा सेक्रेटरी म्हणून महागाई,बेकारी,भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग व अनेक वेळा तुरुंगवास. २५ जून १९७५ काळात आणीबाणीचा निषेध करण्यासाठी शनिवार वाड्यासमोरील सर्वपक्षीय सभेत भाषण,नंतर भूमिगत व आणीबाणी विरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग. २ ऑक्टोबर १९७५ रोजी दिल्लीच्या राजघाटावरील महात्मा गांधींच्या समाधी जवळ प्रार्थना सभेत इंदिरा गांधी समोर महाराष्ट्रातील निवडक सहकाऱ्यांसह सत्याग्रह केला. सत्याग्रहामुळे तिहार जेलमध्ये तुरुंग अधिकाऱ्याच्या लाठी हल्ल्यात जखमी. दीड वर्ष तुरुंगवास झाला. याच काळात ह.वी. कामथ,चरणसिंग,प्रकाश सिंह बादल,किशन पटनायक आदी नेत्यांचा परिचय व सहवास झाला. १९७७ मध्ये जनता पक्षात प्रवेश करून पूर्णवेळ पक्ष कार्य केले. एस. एम. जोशी यांच्या नेतृत्वाखालील राज्य कार्यकारणी सदस्य. पक्षाच्या उमेदवारासाठी राज्यभर दौरा. १९८४-८८ त्या काळात महाराष्ट्र जनता पक्षाचा सरचिटणीस म्हणून जबाबदारी. याच काळात पक्ष बांधणीसाठी राज्यभर प्रचार व दौरे केले. निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान याचकाळात राज्याबाहेर दौरेही केले. त्यामुळे विविध नेत्यांशी मैत्रीचे संबंध जोडले. याच काळात इंदापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी १५ दिवस त्यांनी पदयात्रा काढली. विधानसभा निवडणुकीत पुलोदच्या निर्मितीत महत्त्वाचा वाटा याच काळात अनेक सामाजिक व सांस्कृतिक संघटनात सहभाग पुण्यातील बुद्धी प्रामाण्यवादी मंच या संघटनेचा संस्थापक सदस्य,प्रथम कार्यवाह व नंतर अध्यक्ष म्हणून जबाबदारी या मंचाद्वारे विज्ञान निष्ठेचा व अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रचार लोकबोधिनी संस्थेच्या माध्यमातून राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आगरकर वाद विवाद स्पर्धा अनेक वर्ष चालविली. लोकबोधिनी तर्फे स्वामी विवेकानंद जयंती निमित्त २५ वर्ष महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली. महात्मा गांधीजींचे विचार रुजवण्यासाठी विविध महाविद्यालयात व्याख्याने दिली. लोक स्वतंत्रता संघटनेत न्यायमूर्ती तारकुंडे व डॉ.रजनी कोठारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम. याच संघटनेतर्फे राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांची महाराष्ट्र राज्यव्यापी परिषद आयोजित केली. झोपड्यांच्या समस्यावर परिसंवाद पोलीस अत्याचाराविरोधी आवाज उठविला. सामाजिक समतेसाठी परिसंवाद आयोजित केला. विविध वर्तमानपत्रात सामाजिक समस्यांवर लेखन केले. युक्रांदच्या संवाद या मुखपत्राचे पाच वर्षे संपादन व लेखन केले. पुरोगामी त्रैमाशिकाचे संपादन केले. दैनिक सकाळच्या पुणे आवृत्तीच्या वर्धापन दिनाला दरवर्षी आवर्जून उपस्थित राहत होते. त्यांनी काँग्रेसच्या शिदोरीचे संपादन केले. सत्य वदे वचनाला,विदर्भाचे मृगजळ,ऐरण आणि घन, प्रबोधनाच्या नव्या वाटा आदी पुस्तके त्यांनी लिहिली. जनता दलातर्फे पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघात विधानसभेची निवडणूक लढवली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेत सहभाग. शरद पवार यांचे ज्येष्ठ विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. काँग्रेस- राष्ट्रवादी या आघाडी सरकारमध्ये दोन वेळा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. यावेळी त्यांचा मानव विकास अहवाल विशेष गाजला होता. राज्याच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेची आखणी केली. यावेळी तालुक्याला उच्च पद मिळाल्याबद्दल डॉ. रत्नाकर महाजन यांचा इंदापूर मध्ये मिरवणूक काढून भव्य नागरी सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर राजकीय वैचारिकतेतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. काँग्रेसने राज्य प्रवक्ते पदाची त्यांच्यावर जबाबदारी दिली. पक्षाची परखड वैचारिक भूमिका मांडण्याचे त्यांनी काम केले. राष्ट्रसेवा दलातही त्यांनी अनेक वर्ष विचार मंथन केले. लोकमान्य टिळक,महात्मा गांधी,पंडित नेहरू,डॉ.राम मनोहर लोहिया,जयप्रकाश नारायण,ग.प्र.प्रधान,ना.ग.गोरे,भाई वैद्य,मधु दंडवते,जॉर्ज फर्नांडिस, चंद्रशेखर,व्ही.पी.सिंग,डॉ.बाबा आढाव,डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या विचाराचा त्यांच्यावर पगडा होता. आज शनिवारी पिंपळे निलख येथील निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार,हितचिंतक व मान्यवरांनी भेट देऊन डॉ.रत्नाकर महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.