राज्यात आपल्या धडाकेबाज आणि कडक कारवायांमुळे सातत्याने चर्चेत असणारे अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बदल्यांच्या नावाखाली २५० कोटी रुपये गोळा केल्याचा खळबळजनक आरोप केला होता. या गंभीर आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या आरोपांवर आता स्वतः तुकाराम मुंढे यांनी अत्यंत आक्रमक आणि कायदेशीर पवित्रा घेत जितेंद्र आव्हाडांना थेट आणि उघड आव्हान दिले आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आणि कायदेशीर नोटीस बजावताना तुकाराम मुंढेंनी डागलेले ५ सर्वात मोठे तोफगोळे खालीलप्रमाणे:
जितेंद्र आव्हाडांच्या आरोपांवर तुकाराम मुंढेंचे ५ मोठे पलटवार:
२४ तासांत पुरावे सादर करा,अन्यथा गाठ माझ्याशी: जितेंद्र आव्हाडांच्या आरोपांना चोख उत्तर देताना मुंढे म्हणाले, "माझ्यावर बदल्यांसाठी २५० कोटी गोळा केल्याचा निरधार आणि खोटा आरोप करण्यात आला आहे. आव्हाडांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी या आरोपांचे ठोस पुरावे २४ तासांत जनतेसमोर मांडावेत,नाहीतर कायदेशीर परिणामांना सामोरे जावे."
चारित्र्यहनन खपवून घेणार नाही,मानहानीची नोटीस: आपल्या प्रामाणिक आणि कडक प्रतिमेला धक्का लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आव्हाडांना मुंढेंनी थेट कायदेशीर नोटीस पाठवली आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय एखाद्या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याचे (IAS) चारित्र्यहनन करणे कायद्याने गुन्हा आहे,त्यामुळे आव्हाडांनी तात्काळ माफी मागावी,अशी मागणी नोटीसमध्ये करण्यात आली आहे.
बदल्यांमध्ये पारदर्शकता,कोणताही घोटाळा नाही: एफडीएमधील बदल्यांच्या प्रक्रियेवर बोलताना मुंढेंनी स्पष्ट केले की,सर्व बदल्या या शासकीय नियमानुसार,गुणवत्तेवर आणि पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या आहेत. यात कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार झालेला नाही.
कारवाईचा धसका घेतल्यानेच राजकीय चिखलफेक: "मी पदभार स्वीकारल्यापासून राज्यातील गुटखा माफिया,भेसळ करणारे आणि नियम मोडणाऱ्या मोठ्या फूड चेन्सवर ऐतिहासिक कारवाया सुरू केल्या आहेत. यामुळे अनेकांचे आर्थिक हितसंबंध धोक्यात आले आहेत. या कारवायांचा धसका घेतल्यानेच माझ्यावर असे खोटे आरोप करून दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे," सा थेट टोला मुंढेंनी लगावला.
दबावापुढे झुकणार नाही,मोहीम सुरूच राहणार: राजकीय नेत्यांकडून कितीही चिखलफेक झाली किंवा धमक्या आल्या,तरी 'सुरक्षित अन्न,निरोगी महाराष्ट्र' ही मोहीम आणि गुटखा माफियांच्या मुसक्या आवळण्याचे काम एका टक्क्यानेही थांबणार नाही,असा ठाम निर्धार मुंढेंनी पुन्हा एकदा व्यक्त केला.