झाडांना सजावटीचा फास,निसर्गाचा श्वास धोक्यात!
मुख्यमंत्री,ठाणे महापालिका आयुक्त,पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निसर्गसत्ता संस्थेचे निवेदन;कायमस्वरूपी बंदी आणि कडक कारवाईची मागणी
ठाणे :- प्रतिनिधी सण उत्सवांचा झगमगाट निसर्गाच्या मुळावर उठू नये...आकर्षक रोषणाईच्या हव्यासापोटी जिवंत झाडे,पक्ष्यांचे अधिवास आणि जैवविविधता धोक्यात येऊ नये,यासाठी झाडांवरील विद्युत रोषणाईला कायमस्वरूपी बंदी घालावी. हरितसंपदेच्या रक्षणासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी निसर्गसत्ता संस्थेने केली आहे यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ठाणे महापालिका आयुक्त,ठाणे पोलीस आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवून संबंधित यंत्रणांनी तात्काळ पावले उचलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. झाडे ही केवळ शहराच्या सौंदर्यात भर घालणारी नैसर्गिक संपत्ती नसून पर्यावरणाचा समतोल राखणारी आणि पक्षी,फुलपाखरे तसेच अन्य सजीवांना अधिवास उपलब्ध करून देणारी महत्त्वपूर्ण जीवनव्यवस्था आहे. मात्र,सण उत्सवांच्या काळात झाडांच्या खोडांवर आणि फांद्यांवर विद्युत तारांचे जाळे गुंडाळून रोषणाई केली जाते. तारांचे आवरण, प्रकाशाचा अतिरेक आणि सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यामुळे झाडांना इजा पोहोचण्याबरोबरच पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
शहरातील वाढते तापमान,वेगाने होणारे काँक्रिटीकरण आणि आक्रसत चाललेली हरितक्षेत्रे यांमुळे निसर्गाचे संतुलन आधीच धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत केवळ सजावटीच्या आकर्षणासाठी जिवंत झाडांवर विद्युत रोषणाई करणे पर्यावरणाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. झाडांचे संरक्षण आणि जैवविविधतेचे संवर्धन ही केवळ नागरिकांची नव्हे,तर प्रशासनाचीही जबाबदारी असल्याचे निसर्गसत्ताने नमूद केले आहे. जिवंत झाडांवरील विद्युत रोषणाई व हानिकारक सजावटीला कायमस्वरूपी बंदी घालावी,नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आणि पर्यावरणपूरक उत्सवांसाठी जनजागृती करावी,अशी मागणी निसर्गसत्ताने केली आहे. झाडांचे महत्त्व केवळ पर्यावरणापुरते मर्यादित नसून ते आपल्या भविष्यासाठी आवश्यक आहे. झाडांवरील रोषणाई टाळणे ही निसर्गाप्रती आपली जबाबदारी आहे. सजावटीपेक्षा निसर्गाचे रक्षण महत्त्वाचे मानून प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी आणि नागरिकांनीही पर्यावरणपूरक उत्सव साजरे करावेत.
डॉ. प्रशांत सिनकर,(पर्यावरण अभ्यासक,ठाणे)