• Total Visitor ( 740437 )
News photo

एल निनोच्या सावटात जलसंधारणाची संधी

Raju Tapal publisher October 23, 2026 15

एल निनोच्या सावटात जलसंधारणाची संधी



नद्या-धरणांतील गाळ उपशासाठी विशेष अभियान राबवा !



निसर्गसत्ताचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; जलसाठा वाढवण्यासह भूजल पुनर्भरण आणि पर्यावरण संवर्धनावर भर



ठाणे :- प्रतिनिधी हवामान बदलाचे संकट आणि एल निनोचे संभाव्य सावट लक्षात घेता, पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्यासोबतच नद्या, धरणे आणि तलावांतील गाळमुक्तीला जलसुरक्षेच्या अभियानाची जोड देण्याची गरज आहे. संभाव्य दुष्काळाच्या आव्हानाचे जलसंधारणाच्या संधीत रूपांतर करण्यासाठी राज्यात विशेष अभियान राबवावे,अशी मागणी निसर्गसत्ता संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राज्यातील प्रमुख नद्या,उपनद्या आणि नाल्यांतील गाळाचे सर्वेक्षण करून आवश्यक ठिकाणी पर्यावरणपूरक पद्धतीने गाळ काढावा, मोठ्या,मध्यम आणि लघु धरणांतील गाळाचे प्रमाण व जलसाठवण क्षमता यांचा अभ्यास करून गाळ उपशाचे नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तलाव, पाझर तलाव, लहान बंधारे आणि पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करून पावसाचे पाणी अडवणे व भूजल पुनर्भरणाला चालना देण्यावरही भर देण्यात आला आहे.



गाळ काढणे म्हणजे केवळ जलस्रोतांची स्वच्छता नव्हे, तर पाणीसाठ्याचे योग्य व्यवस्थापन आणि भविष्यातील जलसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. मात्र, गाळाची गुणवत्ता तपासून त्याची योग्य ठिकाणी पुनर्वापरासाठी व्यवस्था करावी आणि प्रदूषित गाळाची सुरक्षित विल्हेवाट लावावी,अशी भूमिका संस्थेने मांडली आहे. त्याचबरोबर नदीकाठची झाडे,नैसर्गिक प्रवाह,जैवविविधता आणि जलचरांचे अधिवास सुरक्षित ठेवूनच गाळ उपशाची कामे करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केलं आहे



शेती आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करताना ठिबक सिंचन,कमी पाणी लागणारी पिके,सांडपाण्याचा योग्य पुनर्वापर आणि पाणी बचतीच्या उपायांना प्राधान्य द्यावे. जलसंपदा,पर्यावरण,कृषी आणि भूजल विभागांनी समन्वयाने जिल्हानिहाय कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी,अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. एल निनोच्या संभाव्य संकटाला सामोरे जाण्यासाठी गाळ उपसा, जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणाची कामे आताच हाती घ्यावीत. मात्र,जलसाठा वाढवताना निसर्गाची हानी होता कामा नये. जलसुरक्षा आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल राखणे हीच शाश्वत विकासाची खरी कसोटी आहे.



डॉ. प्रशांत सिनकर (पर्यावरण अभ्यासक, ठाणे) 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement