कल्याणमधील अन्नपूर्णा गेस्ट हाऊसमधील कथित देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश!
ठाणे क्राइम ब्रँचची कारवाई;१५ महिलांची सुटका,मॅनेजर आणि वेटरला अटक,मालकाचा शोध सुरू
राजू टपाल.
कल्याण:- कल्याण शहरातील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झुंजारराव मार्केट परिसरात असलेल्या अन्नपूर्णा गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या कथित देहव्यापाराच्या रॅकेटवर ठाणे शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने (AHTC) छापा टाकला. या कारवाईत १५ महिलांची सुटका करण्यात आली असून,गेस्ट हाऊसच्या मॅनेजर आणि वेटरला अटक करण्यात आली आहे. तर गेस्ट हाऊसचा मालक फरार असून,पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गुप्त माहितीच्या आधारे छापा मिळालेल्या माहितीनुसार,अन्नपूर्णा गेस्ट हाऊसमध्ये ग्राहकांना देहव्यापारासाठी महिला उपलब्ध करून दिल्या जात असल्याची गोपनीय माहिती ठाणे शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहक आणि पंचांच्या मदतीने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईदरम्यान कथित देहव्यापाराच्या रॅकेटमधून १५ महिलांची सुटका करण्यात आली. तसेच गेस्ट हाऊसच्या मॅनेजर आणि वेटरला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. गेस्ट हाऊसचा मालक फरार प्राथमिक माहितीनुसार,गेस्ट हाऊसचा मालक,मॅनेजर आणि वेटर यांच्या संगनमताने अनेक वर्षांपासून हा कथित अवैध व्यवसाय सुरू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित गेस्ट हाऊसचा मालक राजस्थानमधील पाली किंवा राजसमंद जिल्ह्यात असल्याची माहिती समोर आली असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विविध बाबींचा तपास सुरू या प्रकरणात पोलिसांकडून अनेक महत्त्वाच्या बाबींचा तपास केला जात आहे. महिलांना देहव्यापारासाठी कोणामार्फत आणले जात होते,या व्यवसायात आणखी कोणाचा सहभाग आहे,तसेच गेस्ट हाऊसमध्ये इतर मॅनेजर किंवा कर्मचारी या प्रकारात सहभागी होते का,याची चौकशी सुरू आहे. सुटका करण्यात आलेल्या १५ महिलांपैकी कोणती महिला बांगलादेशी नागरिक आहे का,याचीही पडताळणी केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. पीटा कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांना सुरक्षित महिला सुधारगृहात पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली,क्राइम ब्रँचचे डीसीपी अमर सिंह जाधव आणि एसीपी मदन बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजली आंधळे,एपीआय स्नेहल शिंदे,महिला पोलीस उपनिरीक्षक दीक्षा ढाकरे,एएसआय विजय पाटील तसेच इतर पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. या कारवाईमुळे कल्याणमधील कथित देहव्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून,या प्रकरणात आणखी कोणाचे धागेदोरे समोर येतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.