• Total Visitor ( 740540 )
News photo

शिक्षकांनो सामाजिक बांधिलकी जपत समाजपरिवर्तनासाठी योगदान द्या!

Raju Tapal publisher October 23, 2026 24

शिक्षकांनो सामाजिक बांधिलकी जपत समाजपरिवर्तनासाठी योगदान द्या!



उत्तम अण्णा भोंडवे यांचे आवाहन;शिरूर-हवेलीतील १४ शिक्षक दांपत्यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव



गौतम पाटोळे:



फुलगाव:- शिक्षक हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून,समाजाला योग्य दिशा देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी शिक्षकांवर आहे. त्यामुळे शिक्षकांनी केवळ शैक्षणिक कार्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत समाजाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे,असे आवाहन उत्तम अण्णा भोंडवे यांनी केले. पेरणे-लोणीकंद येथील समाज प्रबोधन केंद्र व संत तुकाराम स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्राच्या वतीने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक दांपत्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी,तसेच भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे भोंडवे यांनी सांगितले. या सोहळ्यात शिरूर आणि हवेली तालुक्यातील एकूण १४ शिक्षक दांपत्यांना ‘महात्मा फुले व सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक दांपत्य पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. साडी,टॉवेल,टोपी आणि सन्मानचिन्ह देऊन पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायणदादा कंद,विकास सोसायटीचे माजी चेअरमन रघुनाथ आप्पा कंद,श्रीमंतराव झुरंगे,माजी मुख्याध्यापक शांतीलाल ब्राह्मणे,एकनाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उत्तम अण्णा भोंडवे यांनी आपल्या जीवनातील विविध अनुभव व प्रसंग सांगत शिक्षकांनी सामाजिक प्रश्नांबाबत संवेदनशील राहून समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. पुरस्कारप्राप्त शिक्षक दांपत्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.



कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर परदेशी यांनी केले,तर राहुल चातुर यांनी आभार मानले.



पुरस्कारप्राप्त शिक्षक दांपत्ये उर्मिला व संजीव मांढरे,रेखा व मारुती कदम,सुनीता व काळूराम पिंगळे,संध्या व धर्मा धुमाळ,आशा व राजाराम सकट,जयश्री व सुनील पलांडे,संगीता व संतोष वेताळ,संगीता व किसान आंबवणे,मनीषा व सतीश केकान,सुलोचना व नवनाथ राऊत,मनीषा व गणेश होले,हर्षदा व मनोहर परदेशी,ललिता व राहुल चातुर,अंजुम व आयुब तांबोळी शिक्षकांच्या कार्याचा गौरव करत सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement