• Total Visitor ( 600315 )
News photo

अखेर रोजच्या त्रासातून शिक्षकांची झाली सुटका

Raju Tapal publisher June 18, 2026 28

अखेर रोजच्या त्रासातून शिक्षकांची झाली सुटका



शालेय स्तरावर माहिती देण्याचा वार फक्त शनिवार



निर्णयाबद्दल होतेय शिक्षकवृंदाकडून समाधान व्यक्त



अमरावती:- वरिष्ठ पातळीवरून सातत्याने दिवसभरात विविध प्रकारची माहिती शालेय शिक्षकांकडून मागविली जाते. त्यामुळे शिक्षकांना अध्ययन करण्यास वेळ मिळत नसल्याच्या तक्रारी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने होत आहेत. शिक्षकांना शैक्षणिक कार्यापेक्षा अशैक्षणिक कामेच अधिक करावी लागत असल्याची ओरड सर्व स्तरातून होत असली तरी याकडे फारसे कुणीच लक्ष देत नसल्याने शिक्षक हैराण झाले होते. या साऱ्या बाबींचा विचार करून शासनाने आता 'माहितीचा वार शनिवार' ठेवण्याचे निश्चित केल्याने शिक्षकांना मोठाच दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे वरिष्ठ पातळीवरून शालेय स्तरावर मागितलेली ऑनलाइन / ऑफलाइन माहिती दररोज द्यावी लागणार नसून ही माहिती आठवड्यातून एकदाच शनिवारी देण्याचे स्पष्ट आदेश राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सर्व विभागीय उपसंचालक,शिक्षणाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.



काही जिल्ह्यांत केला प्रयोग



सद्यस्थितीत केंद्र शासनाच्या / राज्य शासनाच्या विविध उपक्रमांचा अहवाल ऑनलाइन ऑफलाइन स्वरूपात शाळा स्तरावरून द्यावा लागतो. तसेच जिल्हास्तर / तालुकास्तर / केंद्रस्तरावरही माहिती शाळांना द्यावी लागते. यामुळे शिक्षकांचा अध्ययन /अध्यापनाचा वेळ माहिती तयार करण्यात व ऑनलाईन स्वरूपात माहिती सादर करण्यात जात असल्याचे निदर्शनास आले आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील पन्हाळा,जिल्हा कोल्हापूर,आष्टी,जिल्हा बीड,अक्कलकुवा,जिल्हा नंदुरबार,एटापल्ली,जिल्हा गडचिरोली या तालुक्यातील प्रत्येकी एका केंद्रामध्ये 'माहितीचा वार शनिवार' या उपक्रमाची पथदर्शी स्वरूपात अंमलबजावणी करण्यात आली. यामध्ये आठवड्याभरात जी काही माहिती ऑनलाइन /ऑफलाईन स्वरूपात मागवली होती ती सर्व माहिती दर शनिवारी सादर करण्याबाबत कळवले होते.



कटकटीतून काहीसा दिलासा मिळाल्याची भावना



या पथदर्शी अभ्यासक्रमांचे या उपक्रमात सहभागी असलेल्या ९० टक्के शिक्षकांनी स्वागत केले,तर ९६ टक्के शिक्षकांनी शिकवण्यासाठी यामुळे पुरेसा वेळ मिळाल्याचे मत नोंदवले. 'माहितीचा वार शनिवार' ठेवल्यामुळे सतत माहिती भरण्याच्या कटकटीतून काही प्रमाणात शिक्षकांची सुटका झाली. शिवाय शिक्षकांना वर्गातील अध्यापनासाठी अधिक वेळ मिळाला विद्यार्थाशी अधिक संवाद साधण्याची संधी मिळाली. या सर्व बाबींचा विचार करून शिक्षकांचा दैनंदिन अध्ययन अध्यापनाचा वेळ माहिती सादर करण्यात जाऊ नये यासाठी हा निर्णय जारी केला आहे.याची अंबलबजावणी कीती टक्के यशस्वी होते ते येणारा काळाच ठरवेल पण दररोजच्या माहीती पासुन सुटका होईल असे वाटते.



शालेय शिक्षण विभागाची

येणारी ऑनलाईन व ऑफलाईन माहिती दर शनिवारी सादर करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे शिक्षकांना वारंवार माहिती संकलन व सादरीकरणाच्या कामातून दिलासा मिळणार आहे. परिणामी त्यांचा अधिक वेळ अध्यापन,विद्यार्थ्यांशी संवाद आणि गुणवत्तावाढीच्या उपक्रमांसाठी उपलब्ध होईल.



- राजेश सावरकर,राज्य प्रसिध्दी प्रमुख,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement