माजी मंत्री मदन बाफना यांचे पुण्यात निधन
शिरूर:- माजी मंत्री मदन बाफना यांचे हृदयविकाराने पुण्यात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. बाफना यांना अस्वस्थ वाटत असल्याने रविवारी सकाळी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना सोमवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा चार मुली,पाच भाऊ,बहीण असा परिवार आहे. बाफना गेली ५५ वर्षे मावळच्या राजकारणात कार्यरत होते. माजी मुख्यमंत्री स्व.वसंतदादा पाटील तसेच शरद पवार यांच्या सोबत त्यांनी अनेक वर्षे काम केले.१९६७ मध्ये एल एल बी चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही वर्षं त्यांनी वडगाव मावळ,पुणे न्यायालयात वकिलीचा व्यवसाय केला.१९७७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. मावळ पंचायत समितीचे सभापतीपदही त्यांनी भुषविले.१९८५,१९९० मध्ये ते मावळ विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले.१० वर्षे आमदार म्हणून त्यांनी मावळ तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. १९८९ मध्ये त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात प्रथमच संधी मिळाली. महसूल,नगरविकास खात्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली.१९९० मध्ये मावळमधून पुन्हा विजयी झाल्यानंतर त्यांच्याकडे विधी,न्याय,अर्थ खात्याच्या राज्यमंत्री पदांची जबाबदारी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी शरद पवार यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला.पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक म्हणून ते सक्रिय राहिले. अजित पवार यांचा गट वेगळा झाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांनाच साथ देण्याचा निर्णय घेतला.श्री.संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून मदन बाफना यांनी मावळ तालुक्यात डी एड,बी एड काॅलेज सुरू केले. आज मंगळवार दि.१५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता त्यांच्यावर वडगाव मावळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत असे समजले.