विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गणवेशासाठी अमरावती जिल्ह्याला २.६६ कोटींचा निधी
शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन महिने उलटले; निधी वितरणास विलंब
अमरावती:- जिल्ह्यात नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक कालावधी लोटल्यानंतर अखेर सरकारी शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गणवेशासाठी निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पहिल्या गणवेशाची शिल्लक रक्कम आणि दुसऱ्या गणवेशासाठी मिळालेला निधी मिळून एकूण २ कोटी ६६ लाख ४८ हजार ४०० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील १ हजार ५५७ सरकारी शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ दिला जातो. शासनाकडून शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना दोन गणवेश उपलब्ध करून देण्याचा दावा केला जात असला,तरी प्रत्यक्षात दुसऱ्या गणवेशाचा निधी उशिरा मिळाल्याने पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पहिल्या गणवेशासाठीही निधी अपुरा
पहिल्या टप्प्यात शासनाने प्रतिगणवेश २४० रुपये याप्रमाणे २ कोटी ४३ लाख १९ हजार ४४० रुपयांचा निधी मंजूर करून तालुकास्तरावर वितरित केला होता. मात्र, या रकमेतही गणवेश शिवून घेण्यासाठी पालकांना अतिरिक्त खर्च करावा लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याच गणवेशात शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळेत हजेरी लावली.
शासनाच्या नियमानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी दोन गणवेश देणे अपेक्षित आहे. यामध्ये नियमित शालेय गणवेशासह स्काऊट-गाईड गणवेशाचा समावेश आहे. दोन्ही गणवेशांसाठी एकूण ६०० रुपये निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ सर्व विद्यार्थिनी, अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थी,बीपीएल कुटुंबातील विद्यार्थी तसेच पात्र ओबीसी व सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिला जातो. मात्र,स्वातंत्र्यदिनही उलटून गेल्यानंतर दुसऱ्या गणवेशासाठी निधी उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश मिळण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.
शाळांना अन्य निधीचीही प्रतीक्षा
दरम्यान,शाळांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आवश्यक असलेली समग्र शिक्षा अभियानाची निधी तसेच सादील रक्कम अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यामुळे अनेक शाळांमधील आवश्यक खर्च मुख्याध्यापक व शिक्षकांना स्वतःच्या खिशातून करावा लागत असल्याचे चित्र आहे. समग्र शिक्षा अभियानाची निधी आणि सादील रक्कम तातडीने शाळांना उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी मुख्याध्यापक,शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समित्यांकडून करण्यात येत आहे.
पंचायत समिती निहाय निधी
क्र.| पंचायत समिती| अनुदान (रुपये)
१| अचलपूर| २९,०७,३००
२| अमरावती| १५,४८,९००
३| अंजनगाव सुर्जी| १४,८१,७००
४| भातकुली| ११,११,२००
५| चांदूर बाजार| १८,६९,३००
६| चिखलदरा| २७,८७,६००
७| चांदूर रेल्वे| ९,७३,२००
८| दर्यापूर| १६,७८,८००
९| धारणी| ५४,८५,२००
१०| धामणगाव रेल्वे| ८,४९,९००
११| मोर्शी| १७,६४,३००
१२| नांदगाव खंडेश्वर| १३,७७,९००
१३|तिवसा| ११,००,१००
१४| वरूड| १७,१३,०००
एकूण| | २,६६,४८,४००
दुसऱ्या गणवेशासाठी निधी उशिरा उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर बराच काळ गणवेशाची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे प्राप्त निधी तालुकास्तरावर तातडीने वितरित करून विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.